भुसावळ –
उत्तम धावपटू असलेले मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक व नुकतीच सोलापूर पोलीस आयुक्तपदी बढती झालेले एम राजकुमार यांची जळगाव येथे भुसावळ स्पोर्ट्स अॅन्ङ रनर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली व सोलापूर पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सहपरिवार अभिनंदन केले. याप्रसंगी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा अधिकृत तिरंगी रंगातील टी-शर्ट देखील या धावपटू दांपत्यास भेट देण्यात आला . यावेळी एम राजकुमार यांनी भुसावळच्या धावपटूंना सांगितले की ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी या टी-शर्ट मध्ये धावताना मला भुसावळची आठवण नेहमी राहील. यावेळी झालेल्या चर्चेत एम राजकुमार यांनी भुसावळ स्पोर्ट्स अॅन्ङ रनर्स असोसिएशनच्या रनिंग, सायकलिंग व विशेषतः दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या रन विषयी सर्व सदस्यांचे कौतुक केले व भुसावळ शहरात एक धावण्याची चळवळ निर्माण या संस्थेच्या माध्यमातून झाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी उत्तम धावपटू असलेले स्वतः एम राजकुमार यांनी धावणे किंवा कुठलाही व्यायाम प्रकार सर्वसामान्य माणसासाठी किती आवश्यक आहे याबद्दल देखील सदस्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ रम्या कन्नन यादेखील उपस्थित होत्या. या धावपटू दांपत्याचा भुसावळ स्पोर्टस् अॅन्ङ रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रविण फालक, डॉ. चारुलता पाटील, प्रवीण वारके, पुनम भंगाळे, डॉ स्वाती फालक व प्रविण पाटील या सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मागील वर्षी मार्च महिन्यात झालेल्या लेडीज रनच्या वेळी उपस्थित असतानाचे सुखद अनुभव देखील एम राजकुमार यांनी बोलून दाखविले व यावर्षी 3 मार्च रोजी होणाऱ्या लेडीज रनला शुभेच्छा दिल्या व शक्य असल्यास मी सहपरिवार या रनमध्ये यावर्षी देखील सहभागी होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली



