भुसावळ,—जळगाव जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे एस जी एस पी अंतर्गत त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँक किंवा कोअर बँकिंग असलेल्या बँकेत वेतन बँक खाते उघडण्याचे शासन परिपत्रक दि. 19/12/2023 अनुषंगाने जाहीर करण्यात आले आहे . त्यानुसार जळगाव जिल्ह्यात कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून पूर्व विभाग भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक तथा समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस नेमाडे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पाटील, राज्य प्रतिनिधी एस एस अहिरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा पाटील, भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरसे, प्रहार शिक्षक संघटनेचे किशोर घुले, समन्वय समितीचे डॉ. मिलिंद बागुल, संतोष कचरे, एस एस जंगले, कृष्णराव विसावे, एल जे भूगवड्या, एम के राणे यांनी दि. 26/ 12/ 2023 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय व वेतन पथक विभाग जळगाव यांचेकडे दिले होते.
माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या निवेदनाची माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांनी त्वरित दखल घेऊन दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा जीएस ग्राउंड जळगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटनांची बैठक बोलावली असून उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वेतन खाते काढण्यात आल्यानंतर संबंधित बँकांमधून विविध लाभ उपलब्ध होऊ शकत असल्याने माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे.



