भुसावळ – दररोज येणाऱ्या नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सक्षम व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांच्या स्वतः शिकण्याची व मूल्यमापनाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः शिकायचे कसे? याबाबत पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित नाशिक विभागस्तरीय प्रशिक्षणात राज्य समन्वयक निलेश घुगे यांनी सुलभकांसोबत ‘सेल्फी विथ सक्सेस’ घेऊन सुलभकांच्या कार्याचे कौतुक केले.

नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर येथील सपकाळ नॉलेज हब अंतर्गत आर्चिड इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाच दिवस नाशिक विभागस्तरीय प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षणात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नऊ शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले. हेच नऊ शिक्षक सध्या तालुकास्तरावर पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. नाशिक येथील प्रशिक्षण वर्गदरम्यान प्रशिक्षणाचे राज्य समन्वयक निलेश घुगे यांनी प्रशिक्षण वर्गांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणादरम्यान सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन सुलभकांचे कौतुक केले. त्यावेळी सुलभकांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यासोबत श्री. घुगे यांनी सेल्फी विथ सक्सेस या अनुषंगाने सेल्फी घेतली. यावेळी राज्य सुलभक डॉ. जगदीश पाटील, रामेश्वर भदाणे, ज्ञानेश्वर शिरसाट यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या राज्य सुलभकांचे प्रथम प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाच दिवस पार पडले होते. त्यावेळी राज्य समन्वयक निलेश घुगे संपूर्ण पाच दिवस राज्य सुलभकांसोबत कार्यरत होते.
प्रशिक्षणात विविध विषयांचा समावेश – अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी असून त्यात प्रशिक्षण संदर्भातील व्हिडिओ पाहून त्यावर चिंतन करून आपले विचार स्वाध्यायाच्या स्वरूपात लिहिणे हा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वाचन साहित्य वाचणे, आव्हान पुस्तिका सोडवणे व अध्ययन प्रक्रिया घडवून आणणे, त्यात प्रशिक्षणार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग करून घेणे याचाही सहभाग आहे.
फोटो ओळी – राज्य सुलभक डॉ. जगदीश पाटील, रामेश्वर भदाणे, ज्ञानेश्वर शिरसाट यांच्यासोबत सेल्फी विथ सक्सेस अंतर्गत सेल्फी घेताना राज्य समन्वयक निलेश घुगे


