भुसावळ : भाजपा सुपर्स वॉरीयर्सला मार्गदर्शनासह भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघाची बैठक तसेच घर-घर चलो अभियानासाठी गुरुवारी शहरात आलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुसावळातील रॅलीनंतर सिंधी कॉलनीत आयोजित कॉर्नर सभेत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचे तोंडभरून कौतुक केले. राज्यातील पहिल्या 25 आमदारांमध्ये सावकारे हे प्रतिभाशाली आमदार असल्याचे ते म्हणाले मात्र खासदार रक्षा खडसे यांचा नामोल्लेख टाळून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला चार लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संजय सावकारे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक सर्वाधिक चांगला आमदार सावकारे
मार्गदर्शन करीत असताना बावनकुळे यांनी आमदार संजय सावकारे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. विधानसभेतील पहिल्या २५ आमदारांमध्ये सर्वात चांगला आमदार म्हणून संजय सावकारे असल्याचे ते सभेत म्हणाले. यावेळी उपस्थितांना आमदारांच्या नावाचा जयघोष केला. बावनकुळे यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचेदेखील उर्जावान मंत्री म्हणून कौतुक केले. तर भाजपा सरकारमध्ये आमदारांची मंत्रीपदी वर्णी !
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आमदारांचे कौतुक करीत असताना उपस्थितांमधूनही आमदारांचा जयघोष सुरू असताना त्यांची मंत्रीपदी वर्णी लागावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असता बावनकुळे यांनी या सूचनेचे स्वागत करीत आपली इच्छा 2024 मध्ये सरकार आल्यानंतर निश्चित पूर्ण होईल व आपण त्यासाठी सरकारकडे आपला निश्चित निरोप पोहोचणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाषणाच्या शेवटी संजय सावकारे यांना खासदार म्हणून सर्वात जास्त मतांनी निवडून आणा, असे आवाहन केले मात्र नंतर चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आमदार संजय सावकारे यांना विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले तर रावेर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतांनी निवडून आणून देशात रेकॉर्ड निर्माण करा, असे आवाहन केले
नरेंद्र मोदी जनतेच्या मनातील पंतप्रधान : रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, नरेंद्रजी मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ही जनतेची इच्छा आहे. पुढील निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित आहे. भुसावळ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.
मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, आगामी निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदारांनी भाजपाला मतदान करून भाजपाचे हात बळकट करायचे आहेत. कठोर विषयातून मोदींजींनी देशात आदर्श निर्माण केला आहे. देशाला मजबूत करण्यासाठी मोदींजीचे हात बळकट करावेत, असेही आमदार म्हणाले. पंतप्रधान मोंदींना विविध समाजाचा पाठिंबा
यावेळी परीट, नाभिक व कास्तकार समाजाच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना निवेदन देत पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवला. पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना सुरू केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले तर उज्ज्वला योजनेबद्दल महिलांनी कौतुक करीत प्रतप्रधानांना यावेळी धन्यवाद दिले. यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच चिमुकल्यांनी राम, लक्ष्मण व सीतेची सजीव वेषभूषा साकारल्याने त्यांचे पूजन बावनकुळे यांनी केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, बापू महाजन, अॅड.बोधराज चौधरी, रमेश नागराणी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, पिंटू ठाकूर, प्रमोद नेमाडे, अजय नागराणी, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, शिशिर जावळे, सुमित बर्हाटे, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद सावकारे, देवा वाणी, विशाल जंगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, मोंटू अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


