भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अत्यंतस सोयीची असलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीहून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत तर लोकप्रतिनिधी मात्र चुप्पी साधून असल्याने प्रवासी अधिकच संतप्त झाले आहेत.

पुण्यासाठी स्वतंत्र गाडीची मागणी
11025 व 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसचा आता अमरावतीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतल्याने भुसावळ विभागातील तसेच जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना त्यामुळे रेल्वेत जागाच मिळणार नाही कारण अमरावतीहूनच ही गाडी फुल्ल होवून धावणार असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे. आधीच भुसावळातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडीची मागणी आहे. ती मागणी पूर्ण करणे दूर उलट आहे ती गाडी अमरावतीपर्यंत करून भुसावळकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. ही गाडी भुसावळऐवजी अमरावतीहून सुटल्यास भुसावळातील प्रवाशांना जागा मिळणार नाही. एवढे होऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहेत.
रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवासी संतप्त
11025, 11026 पुणे – भुसावळ- पुणे ही दररोज धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस आता भुसावळऐवजी अमरावती येथून सुटेल. भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा आदी भागांतून पुणे येथे जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे भुसावळ स्थानकातून पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असावी, अशी मागणी होती. त्यानुसार काही वर्षांपूर्वी मनमाड येथून सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावरून सुरू करण्यात आली. या गाडीचा प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही ही गाडी आता अमरावतीहून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


