भुसावळ दुर्गोत्सव विसर्जन : मुख्य रांगेत ४४ सार्वजनिक मंडळांचा सहभाग ; १४ उपरस्ते विसर्जनाच्या दिवशी बंद !

भुसावळ – विसर्जन एका दिवसांवर आल्याने पालिका व पोलिस प्रशासनाकडून विसर्जनाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. यंदा ३७ सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे देवीचे बुधवार, २५ रोजी विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पोलिस व पालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले असून बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मिरवणूका काढण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

यंदा विसर्जन मिरवणुकीतील वाद्य वाजविण्यास रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असल्याने दहा वाजेपर्यंत मिरवणुका आटोपण्यावर पोलिस प्रशासनाचा भर आहे. पालिकेकडून तापी नदीवर क्रेन, आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे बोट व बॅरेकेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.शहरातील आठवडे बाजाराजवळील नृसिंह मंदिरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. यंदा विसर्जन मिरवणुकीत ३७ मंडळांना पोलिसांनी परवानगी देण्यात आली आहे. शहरात १७६ मंडळांतर्फे दुर्गा स्थापना केली असलीतरी मिरवणुकी व्यक्तीरिक्त अन्य मंडळे ही त्यांच्या परीने विसर्जन करण्यासाठी नदीवर अथवा हतनूर धरणावरतील जातील. तापी नदी पात्रात क्रेनद्वारे मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली तर पालिकेच्या माध्यमातून सुध्दा नियोजन करण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. याबाबत मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याशी डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी चर्चा केली आहे. त्यामुळे शहरात विशिष्ट लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे मिरवणुकीतील उपद्रवींवर तिसऱ्या डोळ्याची नजर असेल. मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्स पर्यंतच्या मार्गाला जोडणारे १४ उपरस्ते विसर्जन मिरवणूकीच्या दिवशी बेरेकेट लावून बंद केले जातील. त्यात शाळा क्रमांक पाचकडे जाणारा रस्ता, भास्कर मार्केट, शनी मंदिर वॉर्डाला जोडणारे तीन मार्ग, अप्सरा चौकातून विठ्ठल मंदिर वॉर्डाला जोडणारा मार्ग, गणेश मॉलपासून शनी मंदीर वॉर्डाला जोडणारा वखार मार्ग, मरीमाता मंदीर व्हीएम वॉर्डाला जोडणारा रस्ता, जामा मशीद लक्ष्मी चौकातून राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणाऱ्या दोन्ही उपरस्त्याचा समावेश आहे. सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्लीला जोडणार रस्ता, मॉडर्न रोडपासून चिरा गल्लीला जोडणारा रस्ता, जनता टॉवर पासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा रस्ता सुध्दा या दिवशी बंद असेल

दुर्गा विसर्जनाच्या दिवशी शहरातील बसस्थानक हे वरणगाव रोडवरील पंधरा बंगला भागातील एसटी डेपोत स्थलांतरीत केले जाणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत बसस्थानक नियमित ठिकाणी असेल व त्यानंतर ते वरणगाव रोडवरील डेपोत स्थलांतरीत होईल तसेच नाहाटा चौफुलीकडून आलेल्या बस या पांडुरंग टॉकीज जवळून यावल, चोपडा, रावेर, बऱ्हाणपूरकडे वळविल्या जाणार आहे.