.

धरणगाव –
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे बुधवारी दुपारी दोघेजण पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पिंप्री खुर्द येथे दोन तरुण दुपारच्या सुमारास आले,त्यांनी वेगवेगळ्या दुकानांवर जाऊन त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी एक पथक पिंप्री खुर्द येथे रवाना केले.
बीट हवालदार मोती पवार, उमेश पाटील, समाधान भागवत, राजू पाटील यांचा समावेश होता.
या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला.विविध भागात ते फिरत राहिले. एका दुकानावर अखेर दोघे जण सापडले. चौकशीत प्रवीण नंदलाल जैस्वाल (खंडवा) आणि राधेशाम शरद जाखेटे (जळगाव) अशी संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. दोघंही जण १०, २० रुपयांची वस्तू घेऊन ५०० रुपयांचे सुटे घेत होते. मात्र, दुकानदारांच्या लक्षात हा प्रकार आल्याने ते अडकले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाळ पाटील यांनी समजावून सांगत दोघांना धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांचा अजून कुठे कुठे सुळसुळाट सुरू आहे,याचा पोलीस शोध घेत आहेत.


