भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून महिलेच्या तरुण मुलाने भाजीपाला विक्रेत्या तरुणासह त्याच्या आईवर नारळ सोलण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना मंगळवार, 20 जून रोजी शहरातील आठवडे बाजारात घडली होती. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने संशयित आरोपी राहुल राजपूत (पंचशील नगर, भुसावळ) यास अटक केल्यानंतर संशयिताला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जीवन लक्ष्मण चौधरी (30) या तरुणाचे एका महिलेशी संबंध असल्याचा संशय महिलेचा मुलगा राहूल राजपूतला झाल्यानंतर त्याने मंगळवारी रात्री 10 वाजता आठवडे बाजार भागात तरुणावर कोयत्याने हल्ला चढवला व नंतर तरुणाची आई बेबाबाई लक्ष्मण चौधरी (52, आठवडे बाजार, मच्छीमार्केट, भुसावळ) यांनादेखील कोयता मारून जखमी केले. हल्ल्यानंतर संशयित पसार झाल्याने त्याचा शोध सुरू असताना संशयित घोडेपीर बाबा दर्गा भागात असल्याची माहिती यंत्रणाला मिळाल्यानंतर त्यास बुधवारी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार रमण सुरळकर, नाईक उमाकांत पाटील, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, जावेद शाह, दिनेश कापडणे आदींच्या पथकाने केली. दरम्या, संशयित राहूल राजपूत याला चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असून या गुन्ह्यात अन्य एक संशयित पसार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.



