इंजिन घाटावरून भुसावळातील प्राध्यापकाचे महागडे मोबाईल लांबवले –

भुसावळ : तापी नदीपात्राजवळील इंजिन घाटावर मुलांना पोहणे शिकवण्यासाठी आलेल्या प्राध्यापकडील दोन महागडे मोबाईल चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून लांबवल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

इंजिन घाटावर चोर्‍या नित्याच्या
शहरातील इंजिन घाटावर बोदवड महाविद्यालयाचे प्रा.रूपेश तुळशिराम मोरे (४१, खडका रोड, फालक नगर, भुसावळ) हे सोमवारी सायंकाळी पाच वाजता दुचाकीवरून पत्नी व दोन मुलांसह आले होते. इंजिन घाटावर ते मुलांना पोहणे शिकवत असताना चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले २२ व ९ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लंपास केले. या प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विकास बाविस्कर करीत आहेत.

यापूर्वीदेखील इंजिन घाटावर अनेक नागरीकांचे मोबाईल दुचाकीच्या डिक्कीतून लांबवल्याचे प्रकार घडले आहेत शिवाय नागरीक पोहण्यासाठी नदीपात्रात उतरताच लक्ष ठेवून असलेले चोरटे काही मिनिटात दुचाकीच्या डिक्कीतील रोकड असलेेले पाकिट व मोबाईल क्षणात लंपास करीत असल्याने पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी तसेच चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अनेकदा चोरटे वाहनधारकांच्या वाहनातील पेट्रोल नळी कापून पेट्रोलदेखील लांबवत असल्याने भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्ताची मागणी होत आहे.