भुसावळ : तालुक्यातील कंडारी शिवारातील प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वे नंबर 228 चा डेव्हलपमेंट प्लॅन नकाशावर रेल्वे प्रिमायसीस एक्सटेंशन फॉर सेंट्रल रेल्वे आरक्षण क्रमांक 76 जी लावण्यात आल्यानंतर रहिवाशांना सातबारा उतार्यावर नावे लावता येत नव्हती मात्र तब्बल 33 वर्षांनी रेल्वेचे आरक्षण हटवण्यात आले असून ते आता रहिवास झोनमध्ये परावर्तीत करण्यात आल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक तीनच्या माजी नगरसेविका अरुणा सुरेश सुरवाडे आणि माजी नगरसेविका शांताबाई दत्तू सुरवाडे यांच्या प्रयत्नाने तब्बल 33 वर्षानंतर हा प्रश्न सुटला आहे.

प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वे नंबर 228 चा डेव्हलपमेंट प्लॅन नकाशावर रेल्वे प्रीमायसीस एक्सटेंशन फॉर सेंट्रल रेल्वे आरक्षण क्रमांक 76 जी होते. 26 मार्च 1991 च्या अधिसूचनेन्वये कलम 50 (2) खाली ते वगळण्यात येवून रहिवास विभागात समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र भुसावळ शहराची सुधारित विकास योजना शासन नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस 3505/644/सी (बी)/05/ नवी 9 दिनांक 21 नोव्हेंबर 2005 अन्वये मंजूर असून ती 15 जानेवारी 2006 पासून अमलात आहे. या मंजूर विकास योजनेमध्ये मौजे कंडारी सर्वे नंबर 228 पैकी 3.35 हेक्टर क्षेत्र विद्यमान रेल्वे वापराखाली दर्शविले होते. माजी नगरसेविका अरुणा सुरवाडे यांनी ही त्रृटी लक्षात आणून देत कंडारी शिवारातील रहिवाशांना शासनाच्या 26 मार्च 1991 च्या अधिसूचनेनुसार रहिवास वापरास बदलून मिळण्याची विनंती केली होती. यानुसार सर्वे नंबर 228 वरील 3.35 हेक्टर क्षेत्र रेल्वे वापरातून वगळून रहिवास वापरात आरेखीक त्रृटी दुरुस्ती म्हणून फेरबदल करण्यास तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी समाविष्ट केल्याने या भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला असून येथे आता विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.


