भुसावळ : सोयाबीन रीफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा टँकर उलटला. या अपघातामुळेह महामार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली तर नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी टँकरमधील सोयाबीन ऑईल लांबवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही मात्र टँकर उलटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघात टाळण्याच्या प्रयत्नात उलटला टँकर
गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जी.जे.12 बी.एक्स.9325) मधून सोयाबीन रीफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट हा नागपूरच्या दिशेने निघाला असताना जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर आल्याने चालकाने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात टँकर कडेला घेतला मात्र यावेळी टँकर उलटल्याने टँकरमधून तेलाची गळती सुरू झाली. नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी तेल लांबवण्याचा प्रयत्न केला. महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली तर तालुक्याचे प्रभारी सतीश कुलकर्णी यांनी सहकार्यांसह धाव घेत पंचनामा केला.


