सुयोग्य पद्धतीने वीज उपकरणे वापरल्यास वाढत्या वीज बिलावर नियंत्रण ठेवता येते – प्रा. डॉ दयाघन राणे : रोटरी क्लबमध्ये व्याख्यान संपन्न :

 भुसावळ  - कालबाह्य वीज उपकरणाचा वापर टाळत सुयोग्य पद्धतीने वीज उपकरणे वापरल्यास आणि ऊर्जा वापराबद्दल चोखंदळ राहिल्यास वाढत्या वीज बिलावर नियंत्रण ठेवता येते असे प्रतिपादन प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी व्यक्त केले .
   येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ मध्ये नुकतेच *"वाढते विजेचे बिल आणि उपाय योजना"* या विषयावर दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयांच्या भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे यांचे व्याख्यान संपन्न झाले.         

   उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचा वाढता वापर आणि अमर्याद वीज वापराचे देशाच्या ऊर्जा भवितव्यावर होऊ घातलेले परिणाम यांची चर्चा करीत असताना प्रा. डॉ दयाघन राणे यांनी सांगितले की विजेचा असा अमर्याद वापर सातत्याने सुरू राहिला तर नजीकच्या भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होतील. आणि त्या वेळी  मानवी समाजाच्या प्रगती आणि विकासाचाच प्रश्न निर्माण होईल. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील विजेची उपकरणे तपासून घ्यावीत तसेच योग्य प्रकारे वापरात आणावीत असे आवाहन केले. आपल्या व्याख्यानात प्रा डॉ राणे यांनी महाऊर्जा या भारत सरकारच्या विभागाने प्रकाशित माहिती चा उल्लेख करत आपल्या घरातील कोणकोणत्या उपकरणांच्या किती वेळ वापराने किती वीज वापरली जाते हे सांगून रोटरी हॉल मधील विजेच्या दिव्यांच्या वीज वापराची तुलना करून विजेचा सुयोग्य वापर स्पष्ट केला. आपल्या व्याख्यानात त्यांनी दैनंदिन जीवनात वापरात असणाऱ्या अनेक उपकरणाच्या वापराच्या शास्त्रीय पद्धती सांगत विजेचा वापर कमीत कमी कसा करता येईल याची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी प्रेसिडेंट ऋषी शुक्ला यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की आपण सर्वांनी महाऊर्जा या भारत सरकारच्या माहिती पत्रकामधील माहिती नुसार डॉ दयाघन राणे यांनी दिलेल्या पद्धतीने आपला वीज वापर नियंत्रणात आणू तसेच वीज बिलावर पण नियंत्रण ठेवू , पण त्या सोबत च पर्यावरणाचे संवर्धन आणि प्रदूषणावर पण मात करायचा प्रयत्न करू.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय रो. चापोरकर यांनी करून दिला तर आभार रो. डॉ माया आर्विकर यांनी मानले. उपस्थित रोटरी सदस्य आणि पाहुण्यांनी एका ज्वलंत विषयावर अत्यंत ओघवत्या भाषेत एक गंभीर पण तांत्रिक विषय अत्यंत सोपा करून सांगितला त्या बद्दल प्रा. डॉ दयाघन एस राणे यांचे व्यक्तिशः आभार मानले.