भुसावळ : शहरात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केल्यानंतर 123 वाहनांची तपासणी केल्यानंतर 42 वाहनांवर विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई केली. सायलेन्सर बदलवीत फटाके फोडणारी बुलेट गाडी जमा करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बुलेटस्वार पोलिसांच्या रडावर
शहरातील विविध भागात पोलिसांकडून शुक्रवारी रात्री 9 ते 12 या वेळात नाकाबंदी केली होती. यावेळी शहरातील गांधी पुतळ्याजवळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंबादास पाथरवट व पोलिस कर्मचारी यांनी यावल, फैजपूरकडून येणार्या वाहनांची कसून तपासणी केली. सुमारे 82 वाहनांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रे असलेल्या वाहनधारकांना सोडून देण्यात आले तर बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक स्वप्निल नाईक यांनी संयुक्तरीत्या नाकाबंदी राबविली. यात पोलिसांनी विना नंबरप्लेटच्या आठ वाहनांवर कारवाई करीत चार हजाराचा दंड वसूल केला तसेच तीन सीट फिरणार्या सात वाहनांवर कारवाई करीत सात हजाराचा दंड केला. बुलेटचे सायलेन्सर बदल केलेली बुलेट ताब्यात घेतली. अन्य 26 केसेस करीत 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला. 42 केसेस बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ केल्यानंतर 24 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


