भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील 24 वर्षीय विवाहिता प्रसुतीसाठी माहेरी आल्यानंतर शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. बाळंतपण झाल्यावर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यावर महिलेस जळगाव येथे हलविण्यात आले मात्र महिलेचा रस्त्यातच मृत्यू ओढवला. या प्रकरणाला पालिकेच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणा जबाबदार असून विवाहितेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी विवाहितेच्या वडीलांनी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानंतर गुरुवारी भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मयुर चौधरी व चमूने वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर व अन्य नर्स याची तब्बल दिड तास चौकशी करीत जाबजबाब नोंदविले.

महिला नर्सने प्रसुती केली
भुसावळ शहरातील जाम मोहल्ला सुनी जामा मस्जिदच्या मागे राहात असलेले सायमा असलम शाह (24) यांचा विवाह व्यारा, जि.वापी (गुजरात) येथे झाला होता. 21 मे 2022 या दिवशी विवाहिता गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी माहेरी आल्या. या काळात दोन महिन्यापासून पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. बाळांतपणाच्या पूर्ण काळात तेथेच उपचार झाले. 22 डिसेंबर 2022 यादिवशी प्रसूतीसाठी सकाळी दाखल केले असता डॉ.किर्ती फलटणकर यांनी पाहणी करून अजून प्रसूतीची वेळ आली नाही, असे सांगितले तर 23 डिसेंबर रोजी सायमाला प्रसूतीसाठी नेण्यात आले. यावेळी तिला मुलगा झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ.फलटणकर या तिथे नव्हत्या, नर्स महिलांनी बाळंतपण केले व विवाहितेला पलंगावर टाकल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने नर्स यांनी तात्काळ महिलेवर पुन्हा उपचार केले आणि जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविले. जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यास आले मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी 20 मिनिटे उशीर झाल्याचे सांगण्यात आले व महिलेस मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी आरोग्य सेवा उपसंचालक, नाशिक व भुसावळ शहर पोलिस निरीक्षक यांच्याकडे अकिल शाह कदीर शाह, शहनाज बी.शब्बीर शाह, जेबुनिसा खलील शाह, शाईन बी.साजिद शाह यांनी लेखी तक्रार केली. याबाबत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे विधान परीषदेत प्रश्न मांडण्यासांठी कागदपत्रे दिले जातील, असे त्यांनी सागितले.
चौकशी केली
जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी काढलेल्या आदेशावरून येथील ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांनी डॉ. फलटणकर व दोन नर्स यांची तब्बल दिडतास चौकशी केली. तिन्ही जणांचे जबाब नोंदवून घेतले. चौकशी अहवाल हा तात्काळ जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे सादर केला जाणार आहे, असे चौकशी अधिकारी डॉ. मयुर चौधरी यांनी सांगितले.
प्रसूतीबाबत योग्य ती काळजी घेतली – डॉ किर्ती फलटणकर बाळंतपणात जे उपचार करायचे ते सर्व उपचार केले आहे. काय उपचार केले, कधी हॉस्पीटलला दाखल केले याबाबतचा सर्व अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सक यांना पाठविला आहे. गुरुवारी झालेल्या चौकशीत डॉ.मयुर चौधरी यांना सर्व कागदपत्रे दाखवल्याचे डॉ.किर्ती फलटणकर म्हणाल्या.


