भुसावळ, ता. ५ : येथे शहर पत्रकार संस्थेतर्फे उद्या (ता. ६) ‘पत्रकार दिनानिमित्त’ या शहरातील मुळ रहिवासी असलेल्या मात्र पत्रकारीतेच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायिक झालेल्या निवडक भुमीपुत्रांचा सन्मान केला जाणार आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
पत्रपंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

या निमित्ताने रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येतील. असे संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण व प्रकल्प प्रमुख उज्वला बागुल यांनी कळविले आहे.


