पीक पेरा नोंदणीच्या अडचणी दूर करा: संतोष सोनवणे

भुसावळ– राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात ई-पीक पेरा पाहणी नवीन ॲप विकसित करून कार्यान्वित केले आहे; परंतु अनेक शेतकरी अशिक्षित आहेत किंवा मोबाईल हाताळता येत नाही. ७५ टक्के शेतकऱ्यांजवळ स्वत:चा अँड्राॅईड मोबाईल नाही. काही भागात नेटवर्क, सर्व्हर डाऊनच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करणे अडचणीचे झाले आहे. हे टाळण्यासाठी शासनाने तलाठ्यामार्फत गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून त्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम द्यावे, अशी मागणी भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदार दीपक धिवरे यांना दिले.प्रसंगी जिल्हा सह समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, उपतालुका संघटक प्रकाश कोळी, उपसरपंच उल्हास भारसके, शाखाप्रमुख शंकर पाटील, गटप्रमुख रमाकांत चौधरी, सुभान गवळी, अल्प संख्यांक उपजिल्हा संघटक सईद शेख भिकारी, तालुका संघटक मोहसीन खान, माजी शहरप्रमुख नामदेव बऱ्हाटे, सर्वेश पाटील उपस्थित होते.या येत आहेत अडचणी:गटातील शेतात मध्यभागी उपस्थित असल्यावरही गटापासून दूर आहात असा संदेश मोबाईलवर येतो. बहुपीक माहिती भरण्याची प्रक्रिया खुप क्लिष्ट आहे. अक्षांश रेखांश अचूक येत नाही. बांधावरून फोटोचा अंदाज घेणे अवघड होतंय. ऑनलाईन नोंदणी न केल्यास ७/१२ मधील पीक पेरा कोरा राहील. त्यामुळे कोणतीही शासकीय मदत मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे, अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.सुशिक्षित बेरोजगारांना काम द्यापीक पेरा ऑनलाईन नोंदणी १५ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. पडीक क्षेत्राची माहिती, बांधावरील झाडांची माहिती कशी भरावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुशिक्षित अनुभवीसाठी ही पद्धत सोयीची असली तरी ७५ टक्के शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून ई-पीक पेरा नोंदणी करणे पूर्णत: अडचणीचे आहे. त्यासाठी शासनाने गावातील तलाठ्यामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता देऊन एक स्वतंत्र यंत्रणा पथक तयार करावे व शेतकऱ्यांच्या ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्यावी अशी मागणी संतोष सोनवणे यांनी केले आहे.