भुसावळ : महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत बाजारपेठ पोलिस ठाणे व मान रेसिडेन्सीपर्यंतच्या रखडलेल्या काँक्रीटीकरण काम अखेर पूर्ण झाले. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गावरील एचडीएफसी बँकेजवळ पावसाळ्यात नेहमी पाणी साचत होते, या कामामुळे पाणी साचणार नाही, वाहनधारकांना दिलासा मिळेल.

आमदारांच्या उपस्थितीचे कामाचे लोकार्पण
बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी बँकेच्या नाल्यापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवणे आदींसह उर्वरित राहिलेल्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते मंगळवारी या कामाचे लोकार्पण होऊन हा रस्ता वाहतूकीसाठी खुला झाला. यावेळी पालिकेचे प्रशासक प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते गिरीष महाजन,राजेंद्र आवटे, देवा वाणी, प्रा. दिनेश राठी,कंत्राटदार योेगेश पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. हा रस्ता चांगल्या गुणवत्तेचा झाला असल्याने शहरवासीयांना सुविधा झाली आहे, असे यावेळी आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
लोखंडी पुलाजवळील कामाची पाहणी
आमदार संजय सावकारे यांनी काँक्रीटीकरण रस्ता कामानंतर लोखंडी पुल तेे महाराणा प्रताप चौकापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. हे काम देखील समाधानकारक पध्दतीने सुरू आहे. दरम्यान, या कामामुळे रस्ते पादचार्यांसाठीही बंद केले जात आहेत. या भागातील व्यवसायावर परीणाम होत असल्याची ओरड व्यवसायीकांनी केली.


