स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 धावपटू धावले एकत्र एकाच वेगात: देशभक्तीच्या घोषणांनी नागरिकांमध्ये उत्साह द्विगुणित” :भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे फ्रीडम रन’ संपन्न

भुसावळ – केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित होत आहेत. सरकारी कार्यालये त्यामध्ये आघाडीवर आहेत. भुसावळात देखील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे त्यानिमित्त विशेष ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले होते. या रनचे वैशिष्ट्य म्हणजे रनर्स असोसिएशनचे 75 धावपटू एकाच वेळी एकाच वेगात सोबत धावले. यावेळी काही धावपटू मोठ्या उत्साहात हाती राष्ट्रीय ध्वज तिरंगा घेऊन मोठ्या दिमाखात धावत होते व भारत माता की जय, वंदे मातरम अशा विविध देशभक्तीपर घोषणा देत होते. त्यामुळे वेगळाच देशभक्तीपर उत्साह शहरातील नागरीक व बाहेरगावच्या प्रवाशांनी यावेळी अनुभवला. यात विशेष म्हणजे महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती. त्याचबरोबर सकाळी रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूने प्रत्येकी दोन धावपटूंच्या जोडीने एकाच ओळीत धावपटू धावत होते. यासाठी आयोजकांतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले होते

.
पहाटे 5:15 वाजता सर्व धावपटू ङाॅ. बाबासाहेब आंबेडकर (डी एस ग्राउंड) मैदानावर जमले. त्यानंतर रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप एक्सरसाइज घेण्यात आली. त्यानंतर ठीक 5: 45 वाजता रिया कोल्हारकर व तुषार वाणी या बालधावपटूंच्या हस्ते झेंडी दाखवून रनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मैदानापासून जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली व तेथून त्याच मार्गे परत व पुढे आरपीडी रोडवरील लिंपस क्लब व पुन्हा मैदान असे 10 किमीचे अंतर सर्व धावपटूंनी एकत्र सहज धावून पूर्ण केले. रनच्या सुरुवातीस आराधना तांबे व रीया कोल्हाळकर या महिला धावपट होत्या. त्यानंतर मैदानावर परत येऊन स्टेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली.दरम्यान नाहाटा चौफुलीवर सर्व धावपटूंतर्फे शहीद स्मारकास वंदन करण्यात आले.

या रनमध्ये कल्याणी भंगाळे, अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, चित्रा करकरे, कीर्ती मोटाळकर, आरती चौधरी, प्रिया पाटील, हर्षा लोखंडे, नीतू सिंग, मंगला पाटील, सोनाली पाटील, दीपा स्वामी ,प्रियंका मंत्री, स्वाती फालक, पुनम भंगाळे, पूनम कुलकर्णी ,सोनाली वारके, डॉ चारुलता पाटील, डॉ नीलिमा नेहेते ,चारुलता अजय पाटील, ममता ठाकूर, पूजा बलके, ङाॅ वर्षा वाङिले ,संगीता चौधरी, रूपाली पाटील, सविता मगरे या महिला धावपटूंसोबतच इसाक गवळी, उमेश घुले ,दर्शन नागदेव, भिवेंद्र भंगाळे, सुरेश सहानी, अॅड. मोहन देशपांडे आदी पुरुष धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.