वरणगाव नगरपरिषदचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाका – पाच वर्षात केलेल्या कामांची चौकशी करा -जिल्हाधिकारी यांना वरणगाव शिवसेनेची मागणी :

वरणगाव – वरणगाव नगरपरिषद च्या माध्यमातून शहरात भोगावती नदीपात्रामध्ये रविवार दि. 17 रोजी कॉलम भरण्याच्या काँक्रीटमध्ये चक्क वाळूमध्ये माती असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून हे काम बंद पाडले होते. त्यानंतर आज दि. 18 सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम करत असल्याने ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकून आतापर्यंत केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे आज सोमवारी दि.18 रोजी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव नगरपरिषदच्या माध्यमातून भोगावती नदीपात्रामध्ये कॉलममध्ये काँक्रिट भरण्याचे काम सुरू होते. काँक्रीटमध्ये चक्क वाळूत 95% माती मिश्रण असलेली वाळू टाकली जात होती. हा सर्व प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. या कामाची गुणवत्ता न तपासता न. प.च्या बांधकाम अभियंता यांनी या कामाला परवानगी दिलीच कशी? माती मिश्रित वाळू असल्यावर देखील बांधकाम अभियंता यांनी धृतराष्ट्राची भूमिका का घेतली? संबंधित ठेकेदार आणि बांधकाम अभियंता तसेच मुख्य अधिकारी यांचे अर्थपूर्ण संबंध तर नाही ना? यामुळेच वरणगाव शहरात होणाऱ्या विविध कोट्यवधी रुपयांच्या कामांची गुणवत्ता न तपासता निकृष्ट पणे वरणगाव शहरात राजरोसपणे बांधकामे सुरू असल्याचेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषद च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात याच ठेकेदाराने कोट्यावधी रुपयांची विविध बांधकामे केलेली आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली (हिपी शेठ), माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.