भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूकडील प्रवासी बाहेर पडण्याच्या गेटजवळ बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या शक्यतेने गुरुवारी सायंकाळी सुरक्षा यंत्रणा हादरल्या मात्र बीडीडीएस यंत्रणेच्या तपासणीनंतर संशयास्पद बॅगेत काहीही नसल्याचा निर्वाळा येताच प्रवाशांसह यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. या प्रकरणी एका प्रवाशाला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूला असलेल्या आऊटर गेटजवळ (बाहेर पडण्याचा मार्ग) गुरुवारी दुपारी चार वाजता बेवारस बॅग पडून असल्याची रेल्वे लोहमार्ग यंत्रणेला मिळताच यंत्रणा कामाला लागली. रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाची मागील बाजू निर्मनुष्य केली तर वाहतूकही थांबवण्यात आली. रात्री सात वाजता बीडीडीएस यंत्रणा आल्यानंतर त्यांनी तपासणी केल्यानंतर बॅगेत आक्षेपार्ह काहीही नसल्याचा निर्वाळा दिल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह लोहमार्गचे निरीक्षक विजय घेर्डे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकृष्ण मीना तसेच एसआयबी निरीक्षक आसीफ शेख यांनाही माहिती कळवताच अवघ्या काही मिनिटात यंत्रणा दाखल झाली.


