जळगाव – आधी लग्नाचे वचन दाखवत नंतर लग्नाला नकार दिल्याने जळगावातील तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. दिव्या दिलीप जाधव (21, रा.हरीओम नगर, कानळदा रोड) असे मयत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मानसिक त्रास दिल्याने तरुणीची आत्महत्या
शहरातील कानळदा रोडवरील हरिओम नगरात दिव्या जाधव ही तरुणी कुटुंबियांसह वास्तव्यास असून तीचे वडील हमाली काम करतात तर आई धुणी-भांडी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करते. दरम्यान, तरुणीचे त्यांच्या समाजातील नीलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते.
दरम्यान, या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तरूण तीची दिशाभूल करीत होता. दोघे एकाच समाजाचे असल्याने त्यांनी समाजातील काही लोकांना घेवून ते पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे मुलाच्या घरी गेले. परंतु त्यांना मुलाच्या कुटुंबियांनी अपमानास्पद वागणुक देवून त्यांना हाकलून दिले होते. 24 जून रोजी तरुणीचे आई-वडील कामावर गेलेले असतांना तरुणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

चॅटींग, फोटो व्हायरलची दिली होती धमकी
तरुण दिव्याला त्याच्यासोबत केलेल्या चॅटींग व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. तरुणीच्या आत्महत्येस प्रियकर निलेश मंगलसिंग गायकवाड (रा.तारखेडा, ता.पाचोरा) व तिची आई जबाबदार असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचा ताबा न घेण्याचा पवित्रा कुटूंबियांनी घेतला होता.
जिल्हाधिकार्यांसह एसपींना निवेदन :
दोघे जण एकाच समाजाचे असल्याने तरुणीचे कुटुंबिय तरुणाच्या घरी गेले होते. यावेळी तरुणाच्या आईने माझा मुलगा एक नाही, चार मुलींशी प्रेमसंबंध करेल. तुमची ऐपत नाही. आमच्या पध्दतीने हुंडाही देऊ शकणार नाहीत असे बोलून अपमानित केले होते. यावर निलेश याने मुलीच्या संपर्कात राहू नये, असे दिव्याच्या काकाने सांगितले असता त्यानंतरही निलेश हा दिव्या एकटी असताना तिच्याशी मोबाईलवर संपर्कात राहात होता आणि त्यानंतर त्रास देणे सुरु केले. तू कुठे लग्न केले तर मुलाकडील मंडळीला तुझ्यासोबतचे फोटो व संभाषणाचे रेकॉर्डींग पाठवेल, तुझे लग्न होऊ देणार नाही अशा धमक्या दिल्या होत्या, असे तक्रारीत नमूद करण्यात आले असून त्या तरुणासह त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
दिव्याने गळफास घेतल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ तरुणीला खाली उतरवून तीला उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरु होते. 20 दिवस उपचार सुरू असतांनाच बुधवार, 13 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्राणवली आणि दिव्याची 20 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झूंज अखेर अपयशी ठरली.


