भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता – कुलगुरू डॉ माहेश्वरी : अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉल येथे पार पडला. अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर यांनी मावळते अध्यक्ष हरर्विंदर ठेठी यांच्याकडून तर सचिव पदी आर्किटेक्ट सन्मित पोतदार यांनी मावळते सचिव आशिष अग्रवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी हे प्रमुख अतिथी तर आ.संजय सावकारे आणि रोटरीचे सह प्रांतपाल अरुण नंदर्षी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रसंगी सर्वप्रथम मावळते अध्यक्ष हरर्विंदर ठेठी यांनी त्यांच्या कार्यकाळातील लेखाजोखा मांडला. डॉ मकरंद चांदवडकर यांनी आगामी वर्षभरात होऊ घातलेले उपक्रम आणि प्रोजेक्ट यांची माहिती दिली.
याप्रसंगी त्यांनी आपल्या संचालक सदस्यांची ओळख करून दिली. त्याबरोबरच १० नवीन सदस्य रोटरी रेलसिटी मध्ये समाविष्ट केले.नवीन सदस्यांमध्ये भुसावळ नगरपरिषदेचे सीओ संदीप चीद्रवार, किरण महाजन,डॉ प्रशांत जाधव,डॉ गिरीश शास्त्री,मिलिंद धर्माधिकारी,विकास भराडे,अविनाश वारके,नीरव पोलदिया,विकास अहिरराव,हरमीत सिंग माखन यांना मुख्य अतिथिंच्या हस्ते रोटरी पिन देऊन क्लब मध्ये स्वागत केले गेले. सहायक प्रांतपाल अरुण नंदर्षी यांनी रोटरीचे प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला यांचा संदेश प्रसारित केला.आ.संजय सावकारे यांनी वर्षभरातील उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक स्तरावर आर्थिक सत्तेचे केंद्र पूर्वेकडे सरकत असतांना भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला विकसित होण्याची असलेली संधी स्टार्ट अप च्या माध्यमातून मिळाली आहे, आज जगभरात सर्वाधिक स्टार्ट अप आपल्या देशात असून रोटरी सारखी आंतरराष्ट्रीय संस्था आणि देशभरातील विद्यापीठे यांचा ताळमेळ साधून अधिकाधिक उद्योजक आणि वैज्ञानिक आपण घडवू शकतो असे गौरवोद्गार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी यांनी काढले.नवनिर्वाचित सचिव सन्मित पोतदार यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष चेतन पाटील व संदीप जोशी यांनी केले.या कार्यक्रमाला रोटरी भुसावळ चे अध्यक्ष, सचिव,ताप्ति व्हॅली च्या सचिव, इनरव्हील क्लबच्या सदस्या, भुसावळ परिसरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,डॉक्टर्स आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.