हुडको कॉलनीतील लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती करा- प्रा. धीरज पाटील यांची मागणी : नागरिकांना जीव मुठीत, अपघाताची जबाबदारी महावितरणची

भुसावळ – शहरातील जळगाव रोड विभागातील हुडको कॉलोनी परिसरात साधारण सहा फुटाच्या उंचीवर वीज तारा खाली आलेल्या आहेत. या ठिकाणाहून रहदारी करणे अगदी धोकेदायक झाले आहे. नुकत्याच एका अपघात या विभागात युवकाचा पूर्ण हात निकामी झाला आहे. वादळी पाऊस आला की नागरिकांना जीव  मुठीत धरून विजेच्या तारांपासून दूर रहावे लागत आहेत. आजही या भागात अनेक ठिकाणी कललेले पोल व  लोंबकळणाऱ्या तारा असे धोकेदायक चित्र दिसत आहेत. याठिकाणी त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे यांच्याकडे केली आहे.

मान्सूनपूर्व तयारीचा नुसता फार्स म्हणावा, अशी महावितरणची सद्यस्थिती आहे. दरम्यान मान्सूनपूर्व तयारीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून केवळ पाच टक्के शिल्लक राहिले, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्याला दुजोरा मिळावा, अशी वस्तुस्थिती नाही. रस्त्यावरील  लोंबकळणाऱ्या  वीज तारा नागरिकांसाठी धोकादायक, असे म्हणायची वेळ आली आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. त्यासाठी स्वतंत्र रित्या खासगी यंत्रणाही नियुक्त केली जाते. परंतु या यंत्रणेकडून खरेच कामे करुन घेतली जातात की नाही, याबद्दल शंका आहे. विद्युत खांबांवरील तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या कापणे, लोंबकळणाऱ्या तारांना सुस्थितीत आणणे, वाकलेले खांब दुरुस्त करणे, खांबावरून दिलेल्या कनेक्शनचे वायर सुस्थितीत आणणे, खांबावरील डीबाला झाकणे बसवणे, ज्या ठिकाणी धोका आहे, अशा खांबांवरील बॉक्सवर तसे लिहिणे आदी कामे या प्रकारात मोडतात. मात्र यापैकी बहुतेक कामे पूर्णत्वास गेलेली नाहीत, हे वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरुन लक्षात येते. ही समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.