हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले –

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या सुमारे 110 मिमी पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे मंगळवारी दुपारी धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोर्‍यात येणार्‍या चिखलदरा येथे सर्वााधिक 24.8 मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी वाढली होती पाण्याची आवक
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात पावसाने दडी मारली होती. यामुळे धरणातून होणारा विसर्ग कमी होता. धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली होती. मात्र, सोमवारी रात्री पाणलोट क्षेत्रात सुमारे 110 मिमी पाऊस झाला. यामुळे आवक वाढली आहे. दरम्यान, दुपारी धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. प्रती सेकंद 96 क्युमेक्स वेगाने नदीपात्रात विसर्ग झाला. पाण्याची आवक कमी असल्याने विसर्ग कमी आहे. दरम्यान, विसर्गानंतर धरणाची 180 दलघमी साठा कायम ठेवला आहे.