जळगाव – एकनाथ शिंदे यांच्या गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर सर्व आमदार सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी आज शनिवारी जळगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बंडखोरांचा निषेध केला.

शिवसेनेशी बंडखोरी करणारे जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, डॉ.हर्षल माने, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, गजानन मालपुरे, कुलभूषण पाटील, विराज कावडीया, किशोर भोसले, जाकीर पठाण, प्रशांत सुरळकर, मंगला बारी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चित्रा चौकातून दुपारी भर पावसात मोर्चाला सुरुवात झाली. चित्र चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, शिवतीर्थ मैदान, बेंडाळे चौक, नेरी नाकामार्गे मोर्चा स्मशानभूमीजवळ पोहचला. स्मशानभूमीच्या बाहेर संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढे मोर्चा मार्गस्थ होऊन अजिंठा चौफुली येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात सहभागी संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, उद्धव साहेबांचा विजय असो, आदित्य साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी बंडखोरांविरुद्ध आक्रोश करीत शिवसेना पक्षाचे समर्थन केले.
मोर्चाच्या समारोपप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी संवाद साधताना, स्व.बाळासाहेबांची शिवसैनिक मानून मी सर्वांशी संवाद साधते अशी सुरुवात केली. आजचा आपला मोर्चा नाही हा आक्रोश आहे. आपला जोश केवळ आजच नाही तर नेहमी टिकला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत आपला आक्रोश दिसला पाहिजे. आपण सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. पुढे देखील आपली ताकद अशी कायम ठेवा, असे आवाहन महापौरांनी केले.
अजिंठा चौफुली येथे राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भर पावसात दिसून आलेल्या गर्दीमुळे खरा शिवसैनिक आज देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे पाहावयास मिळाले.


