एरोंडल नजिक भिषन अपघात : उभ्या ट्रक वर कारची जोरदार धडक : एक जागीच ठार ,दोन गंभीर जखमी :

एरंडोल – येथून जळगाव कडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर दुपार पासून थांबलेल्या ट्रकला मागून आलेल्या व्हॅगनआर मारुती कारने जोरदार धडक दिली.
या अपघातात चंद्रकांत नामदेव पाटील वय ४५ वर्ष राहणार नगाव (धुळे) हे जागीच ठार झाले तर त्यांचे साथीदार अशोक तोरवणे वय ४८ वर्ष, व सतीश हेमचंद्र चौधरी वय ४७ वर्ष दोघे राहणार शिंदखेडा हे गंभीर जखमी झाले ही दुर्घटना सोमवारी ६ जून २०२२ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सीजी ०४ जेडी ०२८२ क्रमांकाचा ट्रक दुपारपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद धाब्यावर थांबला होता. या उभ्या ट्रकला एम एच २० सी एस १३८४ क्रमांकाच्या मारुती कारणे जोरदार धडक दिली त्यात कार मधील चंद्रकांत नामदेव पाटील हे जागीच ठार झाले तर अशोक तोरवणे व सतीश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यावेळी माजी जि.प. सदस्य नाना महाजन, रवींद्र चौधरी प्रमोद महाजन हे पिंपरी प्रचा येथे लग्नाला हजेरी लावून एरंडोल कडे परत येत असताना त्यांना अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी पोलीस स्टेशनला व ग्रामीण रुग्णालयाला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व घटनेची माहिती दिली.
पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी नाना भाऊ महाजन व त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांनी मदत कार्य केले.
दरम्यान एका खाजगी गाडीने दोघा गंभीर जखमी व्यक्तींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले . वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून ॲम्बुलन्सने त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आले.
सी एन पाटिल सर हे धुळे येथील शिक्षक सेनेचे जिल्हाअध्यक्ष असल्याचे समजते . त्यांचे सोबत कार मध्ये दोघे जण होते हे तीघे जळगाव येथे लग्नासाठी गेले होते लग्नाला हजेरी लावल्यानंतर ते धुळ्या कडे घरी परत जात असताना एरंडोल नजीक क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली. व या दुर्दैवी अपघातात धुळे येथील सी एन पाटिल सर हे जागीच ठार झाले .
याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील ,पंकज पाटील, राजेश पाटील हे तपास करीत आहेत.