भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2022 अंतर्गत पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला. ह्या दरम्यान महाविद्यालयांचे प्रांगण विद्यार्थी व विद्यार्थिंनींनी केलेल्या वैविध्यपूर्ण पेहरावांमुळे उत्साहात न्हाऊन निघाले होते.

ह्या दरम्यान बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी पारंपरिक वेशभूषा दिवस हा भारतातील विविध जाती, धर्म तसेच लोककला आणि संस्कृतीचं मनोज्ञ दर्शन घडविणारा सांस्कृतिक उत्सव ठरतो. वेगवेगळ्या ठिकाणचे आणि वेगवेगळ्या शाखांमध्ये ज्ञानार्जन करणारे भावी अभियंते व अभियंत्या पारंपरिक वेषभूषेच्या माध्यमातून ज्यावेळेस महाविद्यलाय परिसरात वावरतात त्यावेळेस भारताला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे दर्शन होते आणि ह्या दिवसाला राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक उत्सवाचे परिमाण लाभत असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ आर बी बारजिभे , अंतरंग 2022 चे आयोजन प्रमुख डॉ.डी.डी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. एस. एम. हरीमकर आणि प्रा. लीना अग्रवाल यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी शुभेच्छा दिल्या.


