एसटीची आवडेल तेथे प्रवास याेजना आजपासून, भुसावळात चार दिवसांचा पास १२७५ रुपयांना :

भुसावळ : कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुन्हा एसटीचे कर्मचारी कामावर हजर झाल्याने, महामंडळाने आवडेल तेथे प्रवास ही याेजना सुरू केली आहे. राज्यभरात बससेवा सुरू झाल्याने, या योजनेतून शनिवारपासून (दि.२३) चार दिवसांचा पास प्रवाशांना मिळणार आहे.

बससेवा सुरळीत झाल्याने आवडेल तेथे प्रवास या याेजनेत महामंडळाकडून आता पास सेवा सुरू झाली अाहे. शनिवारपासून संपूर्ण राज्यभरात ही योजना सुरू होणार आहे. त्यानुसार प्रवाशांना अावडेल तेथे प्रवास या याेजनेतून चार दिवसांचा पास दिला जाणार आहे. या याेजनेत साध्या गाडीसाठी चार दिवसासाठी १२७५ रूपये, तर अांतरराज्य व वातानुकुलित बससाठी चार दिवसाचे १५२५ रूपये भाडे माेजावे लागणार अाहे. यात शिवशाही बसचाही समावेश अाहे. या याेजनेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
सर्व कर्मचारी कामावर
भुसावळ अागारातील १०० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी येथील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेससाेबतच काही बसेस ग्रामीण भागातही साेडण्यात अाल्या.