भुसावळ -तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे मंगळवार दि.१९ रोजी खंडेरायाची यात्रोत्सव पार पडला. कुऱ्हे पानाचे सह, महादेवमाळ, मांडवेदिगर, मुशाळतांडा, भिलमळी,मोंढाळे, वराडसिम, गोजोरे, सूनसगावसह परिसरातील ग्रामस्थांनी या यात्रोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यात्रेच्या दिवशी खंडेराव महाराजांच्या मंदिरासह गावातील विविध मंदिरात विधिवत पूजा केली. ग्रामस्थांनी दिवसभर यात्रेत खरेदीचा आनंद घेतला. सायंकाळी परंपरेनुसार कलंकामाता मंदिरापासून बारी वाड्यापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. कोराना काळात दोन वर्षापासून यात्राउत्सव बंद होता. त्यामुळे या वर्षी यात्रोत्सवासाठी स्थानिक गावातील विविध शहरात राहणारे नागरिक गावात आले होते. त्यामुळे यावर्षीच्या यात्रोत्सवात आनंदाची भर पडली.
भगत संतोष रमेश पारधी यांनी बारागाड्या ओढण्याची जबाबदारी सांभाळली. बारागाड्या पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलांची संख्या जास्त होती. दोन वर्षानंतर यात्रेत पाळणे, विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली होती. यात्रेत होणारी गर्दी पहाता कुठेही अनुचित प्रकार घडू नये. तसेच बारा गाड्या ओढणे निर्विघ्न पार पडावे यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त केला. यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.



