भुसावळ – स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रनचे रविवार 27 मार्च रोजी रेल्वे क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चारशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला असून प्रत्येक स्पर्धकास आयोजकांतर्फे टी-शर्ट, बीब व रन पूर्ण केल्यानंतर पदक दिले जाईल. टी-शर्ट व बीब शनिवारी 26 मार्च रोजी संतोषीमाता हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत वितरित होईल. बीब क्रमांक आवश्यक असून त्याशिवाय रनसाठी परवानगी नसेल असे संयोजिका डॉ नीलिमा नेहते व डॉ चारुलता पाटील यांनी कळविले आहे.
या रनसाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मुख्य प्रायोजक असून साई जीवन सुपर शॉपी, भेल इंडिया लिमिटेड, हॉटेल मल्हार सहप्रायोजक आहेत.
स्पर्धेचा मार्ग:
3 किमी: रेल्वे क्रीडांगण- डी आर एम ऑफिस- गांधी पुतळा – बाजारपेठ पोलीस स्टेशन व तेथून पुन्हा त्यास मार्गे क्रीडांगणावर परत.
5 किमी:
रेल्वे क्रीडांगण- डी आर एम ऑफिस -गांधी पुतळा -बाजारपेठ पोलीस स्टेशन- जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपी व त्यास मार्गे क्रीडांगणावर परत.
10 किमी: रेल्वे क्रीडांगण- डी आर एम ऑफिस- गांधी पुतळा- बाजारपेठ पोलीस स्टेशन- जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शोपी- तेथून U टर्न घेत- गांधी पुतळा- लिंपस क्लब व तेथून डीआरएम ऑफिस व क्रीडांगणावर परत.
यादरम्यान ठीकठिकाणी भुसावळ रनर्सचे स्वयंसेवक उपस्थित राहतील व महिला स्पर्धकांचा उत्साह वाढवतील. शिवाय प्रत्येक महिला स्पर्धकाने धावताना सोबत पाण्याची लहान बाटली ठेवावी व प्रदूषण टाळावे असे आवाहन प्रवीण फालक यांनी केले आहे



