नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राज्य सरकारने आयएएस अधिकारी गंगाधरन डी.यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. गंगाधरन डी.हे 2013 चे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या मंत्रालयात मुख्य सचिवांचे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी एक दिवसांपूर्वीच केला गौरव
कोरोना संकटात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी ‘शासकीय मदत दूत’ योजना राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना विशेष पुरस्काराने एक दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सन्मान झाला. यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री अॅड..यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास सचिव श्रीमती आय ए कुंदन, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील आदि उपस्थित होते.
सुरज मांढरे यांचे नाशिक विकासात योगदान
दरम्यान, नाशिक जिल्ह्याचा कोरोना लढा, विविध निवडणुका आणि अन्य कार्यक्रम हे सुरज मांढरे त्यांच्या नेतृत्वात झाले. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. त्यामुळेच नाशिकच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील 40 महसूल अधिकार्यांनी कोरानामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 56 विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत कण्याची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही पालक गमावल्यानंतर अनाथ झालेल्या या बालकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पालकांअभावी ही बालकं सध्या जवळच्या नातेवाईकांकडे राहात असून अनेकांच्या नातेवाईकांना अनाथ मुलांचा अतिरिक्त भार उचलणे कठीण झाले आहे. अशा बालकांचे शासकीय मदत दूत बनून हरप्रकारे मदत करण्याचा हा उपक्रम आहे. त्यात सहभागी प्रत्येक अधिकार्यांनी त्यांच्या मुलांच्या भेटीगाठी, त्यांना मदत, संपर्क सुरू केला आहे. पाच लाखांची शासकीय मदत, शैक्षणिक खर्चाव्यतिरिक्त अधिकार्यांनी उपक्रम म्हणून त्यात सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: जुळ्या मुलींची जबाबदारी घेतली आहे.


