नाशिकरोड : डम्परखाली सापडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक रोड दत्त मंदिर चौकात हा अपघात घडला. मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून हे दाम्पत्य दुचाकीने येत असताना ही दुर्घटना घडली. चेहेडी नाका साई विहार अपार्टमेंटमध्ये राहणारे विठ्ठल दादा घुगे (49) व त्यांची पत्नी सुनीता घुगे (47) अशी ठार दाम्पत्याची नावे आहेत.

अपघात पाहून अनेकांना आली भोवळ
बुधवारी मखमलाबाद येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दाम्पत गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून घुगे दाम्पत्य हिरो होंडा (एम.एच.15 ई.व्ही.1867) दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गाने चेहडीला घरी जात असताना दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास दत्त मंदिर सिग्नल जवळील हॉटेल सदगुरू समोर येताच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डम्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही डम्परच्या चाकाखाली सापडून चिरडल्या गेले. अपघातात क्षणार्धात पती-पत्नीचा जागीच अंत झाला, तर अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा व हाडामांसाचा सडा पडलेला होता. अपघातानंतर डम्परचालक उड्डाणपुलावरून पळून गेला. या प्रकरणी राजेंद्र दादा घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृत विठ्ठल घुगे हे एका मोठ्या खाजगी हॉटेलमध्ये कामास होते. त्यांच्या पश्चात स्नेहल (21), श्रावणी (16) या दोन मुली आहेत.अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, दुय्यम पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी पाण्याचा टँकर बोलवून पाण्याने रस्ता धुण्यात आला.


