कुली बांधवांचे रेल्वे नोकरीत समायोजन करा – मागणी : महाप्रबंधकांना निवेदन –

भुसावळ : कुली बांधवांचा रेल्वेत नोकरी देवून समायोजन करावे, अशी मागणी शुक्रवारी भुसावळ दौर्‍यावर आलेले रेल्वे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनतर्फे करण्यात आली आहे. निवेदनाचा आशय असा की, रेल्वेचा जुना साथीदार हा कुली बांधव असताना रेल्वेने बदलत्या युगात कात टाकून प्रगतीचे शिखर गाठले मात्र कुली बांधव आहे त्या परीस्थितीतच जीवन जगत आहे. आज कुटुंबाचे पोटही ते भरू शकत नाही, अशी स्थिती त्यांच्यावर आल्याने रेल्वेत कुली बांधवांना नोकरी मिळाल्यास त्यांच्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवणे सोयीचे होणार आहे.
रेल्वेतील कुली बांधवांना रेल्वेत नोकरी मिळाल्यास त्यांचे सामाजिक परीवर्तन होईल तसेच परीवाराचे पालन-पोषण करणे सोयीचे होवून मुलांना चांगले शिक्षण देता येणार आहे. सेप्टी कॅटीगिरीत अनेक पदे खाली असून तेथे या कुली बांधवांचे समायोजन करण्याची मागणी करण्यात आली. भारतातील सर्व कुली बांधवांना रेल्वेत नोकरी द्यावी, वयोवृद्ध कुलींना सरकारी नोकरी द्यावी तसेच मेडिकल अनफिट कुली बांधवांना शिपाई वा माळी आदी पदावर नोकरी देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनचे विभागीय अध्यक्ष अनिल सावळे, विशाल गवई, रफिक गवळी, मोहसीन पटेल, हमीद अली, तारीख कुरेशी आदींची उपस्थिती होती.