जळगाव – भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परीवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर हस्तांतरीत (ट्रान्सफर) केल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते शिवाय जळगाव आरटीओचा कारभारतही यातून उघड झाला होता. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयात तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून आता अन्य संशयीतांरील कारवाईकडे लक्ष लागले आहे .

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी संशयीत अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भोळे यांना अटक करण्यात आली.
अन्य संशयीतांच्या वाढल्या अडचणी
खोटेनगरातील अशोक पाटील यांचा मोबाइल वापरला गेला आहे. दरम्यान, आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाईल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या तिन्ही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी झाली. दुसरीकडे दक्षता समितीमधील सहायक परीवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी 6 व 7 जानेवारी रोजी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली. अधिकारी, कर्मचार्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळले.
चौघांवर निलंबनाची कारवाई
यानंतर जे.बी.कुलकर्णी, गणेश देवरे, सुनील पाटील व मनोज पाटील या चार लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चौकशीअंती तीन जणांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.


