जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे वीज तारांमध्ये पतंग अडकल्याने तो काढताना 10 वर्षांच्या मुलाला विद्युत तारांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 14 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. ऐन संक्रातीच्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर कुसुंबा गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. हितेश ओंकार पाटील (10, रा.गणपती नगर, कुसुंबा, ता.जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. हितेश हा जळगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होय.
हितेश हा आपल्या मित्रांसोबत कुसुंबा गावातील मैदानावर पतंग उडवायला गेला असता अचानक पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला व पतंग ओढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.



