ठाणे : तब्बल 414 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यवधी रुपयाचा गंडा घालणार्या त्रिकूटाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना ठाणे न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जमील अहमद मोहम्मद दरगाही शेख, गोविंद हनुमंत सिंग,आशिष कुमार उदयराज सिंग अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चोरलेला डेटा दुसर्या कार्डवर पेस्ट करत एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करीत असल्याचे समोर आले. दरम्यान या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत जवळपास 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून या त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

बोलण्यात गुंतवून गंडा
फिर्यादी वंदना विजय गोरी या 10 जुलै 2019 रोजी बँक ऑफ बडोदा, दहिसर या एटीएममध्ये दहा हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी गेल्या असता त्याचवेळी एटीएम मध्ये तीन अज्ञात इसमांनी शिरकाव केला. वृद्ध महिला वंदना गोरी यांचा नातू नीरज याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडे असलेले एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत, आरोपीने एटीएम कार्डचा डेटा चोरी केला. तब्बल 73 हजार 200 रुपये बनावट एटीएम कार्डद्वारे काढून या वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हा दाखल झाल्यानंतर डायघर पोलिसांना आरोपी शोधून जेरबंद करणे म्हणजे तारेवरची कसरत आणि एक आव्हानच होते.
तब्बल 400 एटीएम कार्डाचा डेटा चोरला
डायघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि त्यांचे तपास पथक यांनी सदर फसवणूक प्रकरणी गंभीरतेने तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिस पथकाने तीन आरोपीना बेड्या ठोकल्या.


