तासगाव : दोन तरुणींसह तरुणाने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना तासगाव तालुक्यातील मणेराजुरीतील येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हरीश हणमंत जमदाडे (21, मणेराजुरी), प्रणाली उद्धव पाटील (19, मूळ गाव जायगव्हाण, ता.कवठेमहांकाळ, सध्या रा.मणेराजुरी) व शिवानी घाडगे अशी मृत तिघांची नावे आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे. तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडल्याने प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

प्रेम प्रकरणातून घटना
आत्महत्या केलेल्या हरीश जमदाडे या तरुणाचे नात्यातीलच प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा असून प्रणालीचे मूळ गाव जायगव्हाण असले तरी ती मणेराजुरीत नातेवाइकांकडे राहत होती. तिने साडी परिधान केली होती. घटनास्थळी हार-तुरे असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, डोंगरावर येतानाच कीटकनाशकाची बाटली घेऊन आल्यामुळे त्यांनी नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. शिवानी घाडगे ही तरुणी हतीद येथील असून, हरीशच्या मित्राची नातेवाईक असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की, आणखी काही कारणांमुळे झाली, याचा नेमका उलगडा झालेला नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


