भुसावळ : भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार, 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून या सभेत रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक, गटारी, ज्येष्ठांसाठी बाके ठेवणे असे तब्बल 264 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
पालिकेच्या 2016-2021 या पंचवार्षिक काळातील ही अखेरची सभा असेल. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ 26 डिसेंबर रोजी संपणार असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, हा कार्यकाळ 29 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे पालिका सत्ताधार्यांनी सर्वसाधारण सभेचे नियोजन केले आहे. यासाठी अजेंडा वितरीत केला आहे.

सभेच्या अजेंड्यावर 264 विषय
सोमवारी होणार्या सभेत एकूण 264 विषय ठेवले आहेत. त्यात प्रामुख्याने भुयारी व खुल्या गटारींचे बांधकाम, रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण, नाल्यांवर संरक्षण भिंत बांधणे, प्रभाग दहामध्ये विविध ठिकाणी स्थळ व नाम दर्शक फलक तयार करणे, प्रभाग सातमध्ये खुल्या भूखंडावर उद्यान विकसित करणे, प्रभाग सहामध्ये रस्ते, विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, बेघरांसाठी निवारा केंद्र, ओपन जिम असे विषय सभेच्या अजेंड्यावर आहेत.
शहरात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा लॉकडाउन लागला होता. यानंतर पालिकेच्या सर्व सभा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. तब्बल पावणेदोन वर्षांनी ही पहिलीच सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.


