भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, भुसावळसह विभागातील विविध राजकीय पक्षातील राष्ट्रवादीत प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार, 5 डिसेंबर रोजी शहरात येणार होते मात्र तांत्रिक कारणास्तव हा दौरा त्यावेळी रद्द झाला असलातरी शुक्रवार, 17 रोजी अजितदादा पवार हे भुसावळ दौर्यावर येत असल्याची माहिती पालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी दिली. दरम्यान, अजितदादांच्या उपस्थितीत पालिकेच्या विकासकामांचे लोकार्पण व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा असे दोन कार्यक्रम होणार आहेत.

राष्ट्रवादीत अनेक दिग्गजांचा प्रवेश
भुसावळ दौर्यावर येत असलेल्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणावर अनेक दिग्गजांचा प्रवेश होणार आहे. अलिकडेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांनी आपली ताकद नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिली आहे शिवाय आगामी काळात जिल्ह्यात पालिका निवडणुका होवू घातल्याने आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी खडसे आता नेमकी काय-काय गणितं मांडतात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे. भुसावळ पालिकेत भाजपाची सत्ता असलीतरी मोठ्या संख्येने नगरसेवक हे खडसे गटाशी जुळलेले आहेत त्यामुळे कोण भाजपात वा राष्ट्रवादीत ? हे देखील अजितदादांच्या दौर्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भुसावळसह, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, मुक्ताईनगर व बोदवड येथील अनेक पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत होणार अनेकांचे ‘इनकमिंग’
भुसावळात विकासकामांचे उद्घाटन व राष्ट्रवादी मेळावा
अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी एक वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोर्कापण तसेच नगरपरीषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होईल तसेच दुपारी दिड वाजता आरपीडी रस्त्यावर डी.एस.ग्राऊंडवर (डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर पटांगण) राष्ट्रवादी जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. दौर्याच्या अनुषंगाने पदाधिकार्यांनी जोरदार तयारीला वेग दिला आहे.


