भुसावळ शिवसेनेतर्फे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास वितरित होणार: १२ डिसेंबर पासून शिवसेना कार्यालयातून होणार सुरुवात :

भुसावळ – भारतामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले असून देशभरातील आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, खाजगी बस सुविधा, विमाने यातून प्रवास करताना तसेच दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन, इत्यादी ठिकाणी लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींना दळणवळण करण्याची सुविधा असणार आहे. या सर्व ठिकाणी आता कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी “युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास” सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास काढणे गरजेचे आहे म्हणून भुसावळ शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या संकल्पनेतून शिवसेना विभागीय कार्यालय, जुना सातारा, जळगाव रोड येथे दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बऱ्हाटे व सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासची नोंदणी तथा वितरण होणार आहे.

नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक :
ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, ती व्यक्‍ती पास काढू शकते. सर्व सामान्यांना हि सुविधा अगदी सहज उपलब्ध होत आहे. लहान मुले यासाठी अर्ज करू शकत नाहीत. लसीकरणासाठी नोंदणीकृत केलेला मोबाइल क्रमांक, पासपोर्ट फोटो अनिवार्य आहे. युनिवर्सल ट्रॅव्हल पास असलेल्या नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवास करण्यास मुभा मिळणार आहे.

नागरिकांनी अभियानाचा लाभ घ्यावा; दीपक धांडे
राज्य सरकारने कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सरकारला वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणाच्या सर्व सुविधा सर्वांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. परिसरातील सर्व संस्था, आस्थापना, कर्मचारी, नागरिक, भाजी विक्रेते, कामगार, ग्राहक, प्रेक्षक, खेळाडू आणि जेष्ठ नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी केले आहे.