(आपल्या दोन्ही मुलींसोबत स्व. सौ. निशा पाटील यांचा एक संग्रहित फोटो.)

भुसावळ – मोटरसायकल अपघात झाल्यामुळे उपचारासाठी पुणे येथे दाखल असलेल्या वडिलांच्या गैरहजेरीत श्रद्धा व भक्ती यांची आई सौ. निशा पाटील यांना देवाज्ञा झाली. त्यामुळे मातेचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी दोघी मुलींवर येवून पडल्याने त्यांनी ती विधिवत पार पाडली. श्रद्धाभक्तीने मातेवर केलेल्या अंत्यसंस्काराच्या अत्यंत हृदयद्रावक प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु तराळले. सौ. निशा पाटील यांच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील जामनेर रोडलगत असलेल्या संतधामजवळील दूर्गा कॉलनीतील रहिवासी सौ. निशा जगदीश पाटील यांना गेल्या एप्रिल महिन्यात असाध्य आजाराने घेरले. तेव्हापासून त्यांच्यावर विविध उपचार सुरू होते. परंतु दुर्दैवाने असाध्य आजार असल्याने सौ. निशा पाटील यांचा भाऊबीजेच्या पवित्र दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, सौ. निशा पाटील यांचे पती डॉ. जगदीश पाटील हे वडिलांसोबत श्रीक्षेत्र मेहूण येथे श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या दर्शनासाठी एकादशीच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाने जात असताना फेकरी रेल्वे उड्डाणपुलावर विचित्र अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाचे हाड मोडले व लिगामेंटला दुखापत झाली. अत्यंत गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संचेती हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे ऑपरेशन होऊन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. मात्र ऑपरेशनच्या तिसऱ्याच दिवशी भुसावळ येथून दुःखद निरोप आला. गेल्या काही महिन्यांपासून असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या सौ. निशा पाटील (वय 33) यांचा मृत्यू झाला. अंत्यविधी व अंत्यसंस्कारासाठी पुणे येथून येणे शक्य नसल्याने त्यांच्या मुली श्रद्धा व भक्ती यांनी अंतिम विधी पार पाडला. तसेच आईस अग्निडागसुद्धा दिला. मुले व मुली असा भेदभाव न करता मुलींनीच आईला अग्निडाग देवून अंत्यसंस्कार केले. हा सर्व अत्यंत हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. अत्यंत सुस्वभावी असलेल्या सौ. निशा पाटील यांचे शिक्षण एम. ए. मराठी डी. एड्. झाले होते आणि यावर्षी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. शिक्षणशास्त्रसाठी प्रवेश घेतला होता. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून श्रद्धा व भक्तीच्या डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र हरपले आहे.
महामंडलेश्वर यांच्यासह विविध मान्यवरांनी केले सांत्वन – फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज, श्रीयज्ञेश्वर आश्रम मेहूणचे हभप शारंगधर महाराज यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी डॉ. जगदीश पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
आज कीर्तनाचा कार्यक्रम – डॉ. जगदीश पाटील यांचे वडील हभप लक्ष्मण महाराज आहेत. अशा अध्यात्मिक परिवारातील सौ. निशा पाटील यांचे स्वर्गवासी गमन झाल्याने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज गुरूवार, दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम नामस्मरणाच्या हेतूने ठेवण्यात आलेला आहे.


