भुसावळ स्टेट बँकेची दिड कोटीत फसवणूक : सहा कर्जदारांना अटक -भुसावळात घर वा इमला नसतांनाही बनावट सौदे पावत्यांद्वारे लाटले कर्ज : मिळकतीचे दाखवले अधिक मूल्यांकन ;


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद नगरात असलेल्या स्टेट बँक शाखेची कर्ज वाटपात तब्बल दिड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 17 कर्जदारांविरोधात गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी रविवार, 24 रोजी दुपारी अटक केल्याने कर्जदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या बँकेत वाटप झालेल्या बोगस कर्ज वाटपाबाबत वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्यानंतर वरीष्ठ स्तरावरून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजेश निवृत्ती मेहरे, शकील इमाम गवळी, आसीफ हुसेन गवळी, गजानन रमेश शिंपी, निलेश जय सपकाळे, पंकज भोजनराव देशमुख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू व बाजारपेठ व शहर पोलिसांच्या पथकाने केली.