पिनाका पॉड चे उत्पादन आता भुसावळ आयुध निर्माणी कडेच – महाप्रबंधक निमजे: भुसावळ आयुध निर्माणीचे दसर्‍याच्या मुहूर्तावर निगमीकरण


भुसावळ – 15 ऑक्टोबर 2021 विजयादशमी निमित्त भारतातील सर्व आयुध निर्माणी या सात नव्या उपक्रमांमध्ये ( महामंडळ) परावर्तीत होत आहे. भुसावळ आयुध निर्माणी नव्याने निर्माण होणाऱ्या यंत्र इंडिया लिमिटेड चा भाग राहणार आहे तसेच भुसावळ आयुध निर्माणी ने अत्यंत कमी खर्चात पिनाका पॉड चे उत्पादन करण्यात सक्षम असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे सैन्यदलाला आवश्यक असलेल्या पिनाका पॉडचे उत्पादन भुसावळ आयुध निर्माणी कडेच राहणार असल्याची माहिती महाप्रबंधक वसंत निमजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संरक्षण व सुरक्षा या क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशातील 41 आयुध निर्माणी यांचे सात वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विभागणी करणार आहेत. त्यातील एक असलेली भुसावळ आयुध निर्माणी ही यंत्र इंडिया लिमिटेडचा भाग बनेल. यामुळे स्वायत्तता, नवाचार, उत्पादकता, दक्षता यांच्यामध्ये उन्नती आणि सुधारणा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी देशातील सर्व आयुध निर्माणी यांचे मुख्यालय पश्चिम बंगालमधील कोलकता हे होते. मात्र या नव्या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे भुसावळ आयुध निर्माणीचे यंत्र इंडिया लिमिटेड अंबाझरी, नागपूर मुख्यालय राहणार आहे. या नवीन व्यवस्थेमुळे आयुध निर्माणीला आपली उन्नती करण्यासाठी तसेच उत्पादक आणि लाभकारी संपत्ती मध्ये वाढ करण्याच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. स्पर्धेच्या या युगामध्ये आयुध निर्माणी भुसावळ ही एक अत्याधुनिक उपक्रमाच्या रूपात प्रगती करेल अशी आशा आहे. यासाठी अधिकारी-कर्मचारी स्तरापर्यंत चर्चा, बैठका करण्यात आल्या असून त्यांच्या सूचनांचे प्रशासन सहर्ष स्वागत करणार करत आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी भुसावळ आयुध निर्माणी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या खासदार, आमदार मंडळ रेल्वे प्रबंधक भुसावळ तसेच जिल्हाधिकारी अशा उच्चपदस्थ अधिकारी व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.

पिनाका पॉड विषयी बोलताना महाप्रबंधक निमजे म्हणाले की, एका पिनाका पॉडची किंमत साडेबारा लाख रुपये असून 38 किलोमीटर त्याची रेंज आहे. पिनाका पॉड हे पूर्वी मेढक, अंबाझरी आणि भुसावळ आयुध निर्माणी मध्ये बनविले जात होते मात्र उच्च गुणवत्ता ठेऊन भुसावळ आयुध निर्माणी मध्ये तयार होणाऱ्या एका पॉडची किंमत ही अन्य दोन आयुध निर्माणीच्या तुलनेमध्ये अतिशय कमी खर्चात असल्याने यापुढे भुसावळ आयुध निर्माणी पिनाका पॉडचे निर्माण करणार आहे. मागील पाच ते सहा वर्षात 256 पिनाका पॉड बनवून देण्यात आले आहे. यंदा शंभर पिनाका पॉड निर्मिती चे उद्दिष्ट असून त्यापैकी 25 टक्के उद्दिष्ट आम्ही आत्तापर्यंत साध्य केले आहे. पिनाका पॉड च्या नवीन मॅक टू ची रेंज 90 किलोमीटर आहे. त्याचे उत्पादन सुद्धा भुसावळ येथे करण्यात येणार आहे. नुकतीच आम्ही गाइडेड पिनाका पॉडचे सफल परीक्षण केले असून लवकरच त्याची सुद्धा मागणी आमच्याकडे येऊ शकते. याव्यतिरिक्त आयुध निर्माणीने रेल्वेच्या उत्पादनांमध्ये ही लक्ष घातले असून रेल्वेकडे त्यासंबंधी नोंदणी केली आहे इलेक्ट्रोमर ट्रेडिंग या रेल्वे डब्याच्या संबंधित उपकरणासाठी आम्ही निविदा भरली होती मात्र त्या ठिकाणी आम्ही चौथ्या स्थानावरती राहिलो. भविष्यामध्ये मात्र आम्ही अधिकाधिक उपकरणे बनवण्यावर भर देणार आहोत यादृष्टीने आमचे कार्य सुरू असून आम्ही आत्तापर्यंत वीस नवीन उत्पादने विकसित केली असून त्या संबंधित आम्हाला तीस कोटींची ऑर्डर सुद्धा मिळाली आहे भविष्यात आम्ही शंभर कोटींचे लक्ष गाठण्याची पुरेपूर प्रयत्न करणार आहे तसेच या नवीन उत्पादनामध्ये रशियन तंत्रज्ञानाने युक्त असे मँगोवुड कंटेनर बनविले आहे त्याचप्रमाणे एच सिक्स्टी बॉक्स सुद्धा बनविला आहे आमच्या कक्षा विस्तार झाल्याने आम्ही नवनवीन तंत्रज्ञान वापरून देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच अन्य क्षेत्रातही आम्ही लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे अशी माहिती महाप्रबंधक निमजे यांनी दिली विजयादशमी निमित्त आयोजित यंत्र इंडिया कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शास्त्र पूजन सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती निमजे यांनी दिली यावेळी अपर महाप्रबंधक निल्डा विश्वास नीलाद्री अपर महाप्रबंधक राजीव कुमार उपमहाप्रबंधक कथा जनसंपर्क अधिकारी बी देविचंद प्रशासकीय अधिकारी प्रशांत कुमार ,कनिष्ठ कार्य अधिकारी एस आर पाटील, एम एस राऊत आदी उपस्थित होते.