भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला गेला.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ.आर.बी.बारजिभे, ग्रंथालय समिति प्रमुख डॉ.डि.डि.पाटील,ग्रंथपाल पी.एस.भट, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा. ए.पी. चौधरी, प्रा.पी.एस.बजाज, प्रा.अनिकेत पाठक, डॉ. श्रीकांत चौधरी, डॉ.नीलेश वाणी, प्रा.राम अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमा दरम्यान प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी “ ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास हे आदरणीय डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे महत्वाचे पैलू होते.” असे सांगितले तसेच “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रत्येक कृतीतून आणि त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकातून भारताला महासत्ता बनवण्याचा संकल्प आणि ध्यास लगेच दिसून येतो. डॉ. कलाम हे प्रत्येकासाठीच आदर्श व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या आदर्शांचे खरे अनुसरण म्हणजे वाचनाची सवय अंगी बाणणे हे होय. एक उत्तम पुस्तक व्यक्ति, कुटुंब, समाज आणि देश यात परिवर्तन आण्याची क्षमता बाळगते तसेच सुसंस्कृत व्यक्तीव निर्माणातून सशक्त राष्ट्रानिर्मितीकडे नेण्याची क्षमता वाचन निर्माण करते. त्यामुळे सगळ्यांनीच डॉ. कलाम यांचा आदर्श घेऊन उत्तम वाचन केले पाहिजे” असे प्रतिपादन केले.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “संशोधन निबंध लिखाण आणि प्रकाशन” ह्या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सादर प्रशिक्षणाला पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिंनिंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.



