अभ्यासपूरक उपक्रमांमधून द्यावी शरीर व बुद्धीला चालना -डॉ. श्रुती पानसे यांचे आवाहन : डायटतर्फे ‘चला शाळेत रमूया’ ऑनलाईन शिक्षण संवाद

भुसावळ – शाळेपासून दूर राहण्यामुळे झालेल्या परिणामांतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची खूप मोठी जबाबदारी शिक्षकांसह पालकांवर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून घरात जखडून बसलेल्या मुलांचे हातपाय व अंतर्गत स्नायू मोकळे होणे गरजेचे आहे. त्यासाठी शारीरिक चलनवलनावर भर दिला जावा आणि मानसिक स्थिरता येण्यासाठी सुरूवातीला अभ्यासक्रमपूरक उपक्रम राबवून बुद्धीला चालना दिली जावी, असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी मांडले.
जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आणि जि. प. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन शिक्षण संवाद या उपक्रमांतर्गत ‘चला शाळेत जाऊया’ या विषयावर डॉ. पानसे यांनी संवाद साधला. प्रारंभी डायट प्राचार्य अनिल झोपे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, बऱ्याच कालखंडानंतर शाळेत आलेल्या मुलांना शाळेत रमविण्यासाठी त्यांची मानसिकता व भावनिकता कशी सांभाळावी याबाबत मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘चला शाळेत रमूया’ हा ऑनलाईन शिक्षण संवाद उपक्रम शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांसाठी लाभदायी ठरेल, असे ते म्हणाले. डॉ. श्रुती पानसे यांचा परिचय मनोज लुल्हे यांनी करून दिला. त्यानंतर ‘चला शाळेत रमूया’ या विषयावर बोलताना डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या की, दीड वर्षाच्या कालावधीत बहुतांशी मुलांच्या मानसिक स्थितीवर हिमनगाच्या टोकासारखे परिणाम झालेले आहेत. अभ्यासासाठी टाळाटाळ करणे, उशीरा उठणे, तासन्तास मोबाईल पाहत राहणे, शारीरिक स्थिरता, विविध छंदांमध्ये न जोपासणे, नेहमी होणारी चिडचिड आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता, त्याप्रमाणे एकमेकांवर राग व्यक्त केल्यामुळे हरवलेले मानसिक स्वास्थ्य असे अनेक लहानमोठे परिणाम वयानुसार विद्यार्थ्यांवर झालेले आहेत. या परिणामांतून विद्यार्थ्याला काढण्यासाठी पालकांसह शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे. प्रारंभी मुलांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. अभ्यासक्रम सुरू करण्याच्या आधी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व आवडीचे खेळ खेळू द्यावे लागतील. त्यांच्याशी गप्पा कराव्या लागतील. अभ्यासक्रमाकडे घेऊन जाताना मुलांना स्वयंअध्ययनातून समजून घेता येतील असे सोपे विषय सुरू करावे, त्यामुळे अभ्यासात रस निर्माण होऊन तो हळूहळू वाढेल, असेही डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या. सूत्रसंचालन उपक्रम समन्वयक डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार डायट अधिव्याख्याता डॉ. विद्या बोरसे यांनी मानले. तंत्रसहाय्य राहूल चौधरी यांनी केले. उपक्रमाचा लाभ शिक्षणक्षेत्रातील अधिकाऱ्यांसह पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने घेतला.

परीक्षा व मूल्यमापनाबाबत सक्ती नको – डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे म्हणाले की, काही दिवसांपासून शाळा सुरू झालेल्या असल्या तरी पहिले सत्र संपत आले असल्याने परीक्षा व मूल्यमापनाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. परंतु मूल्यमापन हे सर्वस्वी शिक्षकाच्या वर्गाशी संबंधित असल्याने शिक्षकांना त्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. सुरूवातीपासूनच मूल्यमापन व चाचणी घेण्यास सुरुवात केली तर मुलांच्या मनावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे सुरूवातीला आकारिक मूल्यमापन आणि त्यानंतर हळूहळू संकलित मूल्यमापनाकडे मार्गक्रमण करावे.

मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचे आव्हान – डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या की, शिक्षणासाठी हातात आलेला मोबाईल आता मुले सोडायला तयार नाहीत. कित्येक वेळ मोबाईल पाहण्याची त्यांना सवय जडली आहे. त्यामुळे हळूहळू त्यांचा मोबाईलचा वेळ कमी करून पालक व शिक्षकांनी त्यांना त्यांच्या आवडीच्या छंदाकडे व विविध उपक्रमांकडे त्यांना वळवावे, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ मोबाईल त्यांच्यापासून दूर राहील. मुलांना दीड वर्षातील अनुभव विचारावे. प्रत्येक मुलाला बोलायला प्रवृत्त करावे. शिक्षकांनी समुपदेशकाची तर पालकांनी मित्राची भूमिका निभवावी.