भुसावळ शहरातील अवैध बॅनर्स/ होर्डींग्स रातोरात पोलीस व पालिका प्रशासनाने हटवले :

 भुसावळ - शहरामध्ये ठीकठिकाणी लावण्यात आलेले सर्व अवैध बॅनर्स पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून रात्री 11 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत काढण्यात आले. 
  जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली. भुसावळ शहरांमध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस हद्दीमध्ये एक  अशा 2 टीम रात्री नेमण्यात आल्या होत्या. या दोन्ही टीम मध्ये नगरपालिका भुसावळ यांच्याकडील स्टाफ त्याचप्रमाणे भुसावळ शहर पोलीस स्टेशन तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्याकडील स्टाफ देण्यात आलेला होता. पूर्ण रात्रभर सदरची कारवाई करून शहरात लावण्यात आलेले सर्व अवैध छोटे-मोठे बॅनर्स /होर्डिंग काढून घेण्यात आले व नगरपालिका प्रशासनाने सदरचे बॅनर जप्त केलेले आहेत. 

शहरातील जामनेर रोड,तापी नदी पात्र ते पाणी गेट त्याप्रमाणेच जुना जळगाव रोड, बस स्टँड,रेल्वे स्टेशन परिसर, रजा टॉवर, खडका चौफुली जोडणारा रोड, खडका चौफुली ते नाहाटा चौफुली दरम्यानचा रोड या सर्व भागातील अवैध बॅनर्स या मोहिमे दरम्यान कडून घेण्यात आले.

   आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही व कोणतेही विनापरवाना बॅनर्स नसावे तसेच कोणतेही  आक्षेपार्ह बॅनर्स लावले जाऊ नये या दृष्टीने तसेच अवैधरित्या लावलेला बॅनर मुळे वाहतुकीस अडथळा येतो. यास प्रतिबंध होण्याच्यादृष्टीने त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. 

भुसावळ शहरांमध्ये नगरपालिकेकडून 48 ठिकाणी अधिकृत बॅनर्स लावण्याच्या जागा ठरवून देण्यात आलेल्यां आहेत. नागरिकास बॅनर लावायचे असल्यास परवानगी घेवून नमूद ठिकाणी बॅनर लावावे.
रात्रीच्या कारवाईमध्ये देखील पूर्वपरवानगीने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कारवाई करण्यात आलेली नाही.अनुषंगाने असे सूचित करण्यात येते की यापुढे शहरांमध्ये कोणतीही अवैध बॅनर /होर्डिंग विना परवानगी लावण्यात आल्यास त्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.

वरील कारवाईमध्ये पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व त्यांच्याकडील सर्व स्टाफ, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, शहर पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ बाजारपेठ पोलीस स्टेशन , शहर पोलीस स्टेशन यांचेकडील स्टाफ ,तसेच पोलीस मुख्यालय येथील एक आरसीपी पथक सहभागी झाले होते.