स्व. स्वप्नीलच्या स्मृती प्रित्यर्थ ललवाणी परिवार साकारतोय गोकुळग्राम – डॉ. जगदीश पाटील:

भुसावळ- येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांच्या मातोश्री ताराबाई मदनलाल ललवाणी यांचे दुःखद निधन झाले. या घटनेच्या पाच महिन्यानंतर चिरंजीव स्वप्निल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लागोपाठच्या या दुःखद घटनांनंतर हताश व व्यथित झालेल्या ललवाणी परिवाराने सामाजिक भान जपून समाजाप्रती आपली आस्था दाखवून दिली आहे. स्व.स्वप्नीलच्या पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन त्याच्या स्मृती जपण्यासाठी भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावाजवळ गोकुलग्रामची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच या दोन्ही स्वर्गस्थांना अर्पण “घरट्यातुन आकाशाकडे” या पुस्तकाचे विमोचन होणार आहे!
स्वप्निल प्रा. ललवाणी सरांचा धाकटा मुलगा. खरोखरच एक स्वप्नासारखा. तो सरांच्या आयुष्यात आला आणि स्वप्नासारखा आयुष्यातून निघून गेला. 1986 मध्ये भुसावळात नोकरीच्या निमित्ताने सर आलेत. त्याच वर्षी स्वप्नीलचा जन्म झाला. स्वप्निल हा खरोखरच एक चांगला आणि हुशार मुलगा. सरांना वाटत होते की, दुसरे अपत्य मुलगी होईल. परंतु मुलगा झाला. म्हणून त्याचे टोपन नाव स्वीटी ठेवले. स्वीटी नावाप्रमाणेच स्विट होता. स्वीटी हा लहान मुलगा असल्यामुळे एकदम नटखट, अवखळ, खोडकर परंतु हुशार व मनाचा हळवा, निरपेक्ष भावनेचा. कोणत्याही प्रकारचे त्याच्या मनामध्ये कधीही, कोणताही द्वेष, राग नसणारा. शिक्षणामध्ये मात्र अत्यंत हुशार व कायम आपल्या मोठ्या भावापेक्षा मी कसा पुढे जाईल? त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क कसे मिळतील? हाच ध्यास त्याला असायचा.

एमबीए-सीईटीमध्ये तर तो धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथम आला होता. विद्यालयांमध्ये असो अथवा महाविद्यालयांमध्ये असो; सर्व प्राध्यापक, शिक्षक त्याची वाहवा करायचे. अशा या स्वप्नीलने कधीच, कोणत्या गोष्टीसाठी सरांकडे हट्ट केला नाही.
शिक्षण संपल्यानंतर लगेच त्याला नोकरी मिळाली. मात्र आपल्या सात वर्षाच्या नोकरी कालावधीमध्ये त्याने पाच कंपन्या बदलल्या. कारण त्याला प्रगतीची उंच उडी घेणे, झेप घेणे, भविष्याचा वेध घेणे माहिती होते. प्रत्येक कंपनीमध्ये त्याचे स्वतःचे वलय असायचं. वरिष्ठ त्याच्या कामाने सदैव खुश असायचे. त्याने स्वप्न बघितले होते की, ललवाणी परिवाराची पुढची पिढी अमेरिकेस स्थायिक होईल. या स्वप्नपूर्तीसाठी तो मेहनतीने काम करायचा. याच बळावर तो कंपनीमार्फत अमेरिकेमध्ये सुद्धा गेला. तिथेच त्याला मुलगा झाला व परिणामी त्याचा मुलगा म्हणजे आरव हा अमेरिकेचा नागरिक झाला. स्वप्निलचे बारावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातच झाले. लहानपणापासून स्पर्धेचे आवड, मग ती वक्तृत्व स्पर्धा असो वादविवाद स्पर्धा असो सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारच. इतकेच नव्हे तर पाच वर्षाचा असताना सुदृढ बालक स्पर्धेत सुद्धा त्याचा प्रथम क्रमांक होता. सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्याची त्याला उत्सुकता होती. के. नारखेडे माध्यमिक विद्यालयात असताना तो सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. रसायनशास्त्र शिकवणारे जी. एम. महाजन सरांना त्याच्याविषयी विचारले असता ते तर भरभरूनच बोलले मात्र त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी शिक्षक असताना सुद्धा मला स्वतःला अभिमान वाटला. विद्यार्थी असा असावा व महाजन सर अक्षरश: त्याच्या आठवणीत ढसाढसा रडले. इतकेच नव्हे तर तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होता. अत्यंत जिद्दी, धाडसी, नटखट, खट्याळ मात्र अभ्यासात हुशार असा स्वप्निल दहावीपर्यंत शाळेचा प्रवास त्याचा सायकलनेच केला. राहणी अत्यंत साधी, मात्र सदैव मित्रांच्या गराड्यात राहायचा. तो हळव्या मनाचा, दानशूर प्रवृत्तीचा होता. एकदा तर चक्क त्याने घरी न सांगताच साधू महाराजांसोबत प्रयाण केले आणि हट्ट धरला की, मला दीक्षा घ्यायची. मग कसे तरी त्याचे मन वळवून त्याला घरी आणले.
लहानपणापासून दोघा भावांमध्ये स्पर्धा असायची. दोघे नोकरीला लागले तर पॅकेज स्पर्धा. अत्यंत प्रेमळ परंतु भावनाशील जीवनात त्याने व्यवहार कधी बघितलाच नाही व मित्रांशी पैशाबाबत सुद्धा त्याने कधी व्यवहार बघितला नाही. असा हा दिलखुलास व्यक्तिमत्वाचा धनी होता. मदत करायला सदैव पुढे असायचा. त्याने ज्याही कंपनीत त्यांनी नोकरी केली, त्या कंपनीत लीडरशिप केली. सातासमुद्रापार अमेरिकेत किंवा कॅनडामध्ये स्थायिक होण्याची त्यांची इच्छा होती. दुर्दैविलास कसा झाला. शनिवार, ३ ऑक्टोबर २०२० रोजी त्याला हृदयविकाराने आपल्या कवेत घेतले. १ ऑक्टोंबर २०२० रोजी त्याने बॅंक ऑफ अमेरिकेची मॅनेजरची परीक्षा दिलेली होती व त्या परीक्षेत ७० लोकांमध्ये त्याचे सिलेक्शन झाले असा मेल त्याला ६ आँक्टोंबर २०२० मरणोपरांन्त आला. बघा स्वप्न होते, ते स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. असा हा स्वप्नाळू एक ललवाणी परिवाराचा स्वप्न होतो. त्याच्या कित्येक पैलूंची उजळणी केली तरी कमी होईल. असा हा हरहुन्नरी, हसतमुखी, सहनशील, मनाचा हळवा, कर्तृत्वाची भरारी घेणारा एक उद्यमशील तरुण ललवाणी परिवाराला चटका लावून गेला.
इतका हा प्रचंड हुशार व्यक्तिमत्व असलेला मात्र मनाने फारच हळवा असा स्वप्निल. त्याचा एक पैलू म्हणजे त्याने ठरवले की, त्याच्या मनात असेल तो ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नव्हता. असा हा एक जिद्दी व धाडसीही होता. तो कधीच प्रेम दाखवायचा नाही, पण मनातून मात्र अत्यंत प्रेम करायचा. त्याच्या मोबाईलमध्ये सरांचे नाव डिअर पापा नावाने सेव्ह होते, परंतु तो त्यांना प्रेमाने ललवाणी सर असेच म्हणायचा. असा आमचा लाडका स्वीटी आम्हांला अचानक सर्वांना सोडून गेला. असे म्हणतात की, गेलेला परत येत नाही. परंतु त्याची जागा कधीही, कोणीही भरून काढू शकणार नाही. कारण ते ललवाणी परिवाराचे शेंडेफळ होते. असा हा स्वप्नील स्वप्नाप्रमाणे आला आणि स्वप्नाप्रमाणेच निघून गेला. मात्र कायम त्याच्या आठवणी मागे ठेवून गेला. मोठा भाऊ सुयश याच्यावर त्याचे अत्यंत प्रेम होते. असा हा बहुआयामी, बहुरंगी व मनाचा भरपूर उदार होता.
प्रा. दिलीपकुमार ललवाणी सर यांच्याशी काही वर्षापासुन परीचय आहेच.पाचोरा तालुक्यातील कळमसरा या छोट्याशा खेड्यातून आजच्या ३६ वर्षांपूर्वी भुसावळला आले व भुसावळकर झाले. महिला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करीत असताना ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले व कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता, कार्यप्रवणता, शिस्त, निष्ठा, असलेले हे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या पाठिशी स्वर्गीय मोतीभाऊ कोटेचा यांचा आशीर्वाद सदैव होता. जिल्ह्यात नामांकीत व्याख्यानमाला सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सतत सोळा वर्ष कपुरचंदजी कोटेचा स्मृती व्याख्यानमालेची धूरा एकखांबी तंबूप्रमाणे त्यांनी सांभाळली. तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी स्वर्गीय पदमबाई कपूरचंदजी कोटेचा महाविद्यालयीन कर्मचारीं यांचे करीता पतपेढीची स्थापना केली. ते संस्थापक अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी विद्यापीठात अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणुन कार्य केले . सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात हा परिवार सदैव कार्यरत राहिला आहे. भुसावळ जैन समाजामध्ये ललवाणी हा एकच परिवार असा आहे की, ज्यांच्या तीनही पिढ्यातील सर्व सदस्यांनी जैन धर्मिय मासक्षमन(३१ दिवस निरंकार) खडतर उपवासाचे तप केले आहेत. तसेच सरांच्या सूनेने सुद्धा नुकतेच अकरा उपवास केले आहेत. तसेच या परिवाराने जवळपास तीन वेळेस धार्मिक यात्रेचे स्वखर्चाने नियोजन केले होते. प्रा. ललवाणी भारतीय जैन संघटनेचे भुसावळ शाखेचे अध्यक्ष होते व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी जैन संघटनेमध्ये भरीव कामगिरी केली होती व त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुराणा आँईलमिल कंपाउंड मध्ये नगरपालीकेकडुन जवळपास पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा मिळाली असून बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. तसेच जैन सोशल गृपमध्ये सुद्धा त्यांनी सल्लागाराची महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मदनलाल ललवाणी हे श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष होते व आज सदैव ते तप व जप मध्ये अग्रेसर आहेत. या परिवाराने कळमसरा येथे सामाजिक बांधिलकी म्हणून मुक्या जनावरांच्या पाण्यासाठी हौदसुद्धा बांधण्यास आर्थिक मदत केली आहे. स्वर्गीय स्वप्नील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या परिवाराने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. रस्ता नसलेल्या आदिवासी पाड्यावर जाऊन त्या तेथील सर्व कुटुंबांना कपडे, भांडे, खाद्यसामुग्री,बँग,चादरी अशी सर्व प्रकारची बहुमोल मदत केली. त्याचप्रमाणे रात्री कुडकुडणाऱ्या व उघड्यावर झोपणाऱ्या रस्त्यावर भटक्यांना उबदार पांघरूण दिले. तसेच अनेक गोशाळांना देणगी दिल्या. मोठा मुलगा सुयश हासुद्धा दानशूर असून मदत करण्यात अग्रेसर आहे. ठाण्यासारख्या महानगरात आज तो जैन समाजामधील एक महत्त्वाचा घटक असून जैन तरुणांचा तो खंबीर सदस्य आहे. स्वर्गीय स्वप्निल यांच्या निधनाने हा परिवार तर पूर्ण खचला त्यात प्रा. ललवाणी हे मात्र पार ढासळले. अनेकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून सुद्धा त्यांचे मन मानायला तयार नाही की, स्वप्निल मला अचानक सोडून गेला. जेव्हाही आपण स्वप्निलची आठवण त्यांच्यापाशी काढतो तर ते अश्रुच गाळतात. आजपर्यंत प्रा.ललवाणी यांना अनेक अडचणी, समस्या, मिथ्या आरोप यांचा सामना करावा लागला. त्या सर्वांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. मात्र याप्रसंगातुन मात्र ते पुरते हादरले आहेत. आता त्यांनी स्वप्निलच्या स्मृतिप्रित्यर्थ गोशाळा सुरु करुन उर्वरित आयुष्य गोसेवेला वाहून घेण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या मातोश्री स्व. ताराबाई मदनलाल ललवाणी व चिरंजीव स्व.स्वप्निल दिलीपकुमार ललवाणी यांना भावपूर्ण आदरांजली.

डॉ. जगदीश पाटील,
भुसावळ
8149498020