फुलगावची दर्जेदार केळी इराणमध्ये रवाना –


वरणगाव : आतापर्यंत केवळ रावेर, यावलमधील केळी आखाती देशांमध्ये निर्यात झाल्याचे ऐकतो. जिल्ह्यातील इतरही तालुक्यात उत्पादन होत असले तरी गुणवत्ते अभावी शेतकर्‍यांचे केळी निर्यातीचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, फुलगाव (ता.भुसावळ) येथील प्रगतशील शेतकरी तथा पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चौधरी यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून पिकवलेली केळी नुकतीच इराणमध्ये रवाना करण्यात आली. त्यामुळे केळी निर्यातदारांच्या तालुक्यात भुसावळचा समावेश झाला.
शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब
शेतकरी चौधरी हे आपल्या शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. प्रामुख्याने नैसर्गिक शेती करण्यावर त्यांचा भर असतो. यामुळे उत्पादन क्षमता वाढून चांगले उत्पन्न मिळते. यातून पिकवलेली केळी एक्स्पोर्ट पोलन अ‍ॅग्रो मिनरलतर्फे इराणला निर्यात करण्यात आली. सध्या आपल्याकडे केळीला 900 ते 1000 रुपये भाव आहे. तर इराणला निर्यात केलेल्या केळीला 1400 रुपये भाव मिळाला. फुलगावचे उपसरपंच राजकुमार चौधरी, कठोर्‍याचे सरपंच प्रशांत पाटील, अतुल झांबरे, संजय चौधरी, पोलन अ‍ॅग्रोचे संग्राम कुरणे, बाळू सहाणे, प्रथमेश चौधरी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा, कष्टाचे चीज होईल
राजेंद्र चौधरी यांनी पिकवलेली केळी इराणमध्ये निर्यात झाल्याची माहिती मिळताच आमदार सावकारे यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन माहिती घेतली. शेतकर्‍यांनी परंपरागत शेती न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. कष्टाने पिकवलेल्या उत्पादनाला देखील भावही चांगला मिळेल, असे सांगितले.