भुसावळ – तालुक्यातील उपविभागीय कार्यालय ग्रामीण भुसावळ अंतर्गत औद्योगिक वसाहत किन्ही येथील ३३ के.व्ही. सब स्टेशन मध्ये पोटेनशीयल ट्रान्सफार्मर फुटल्याने दोन कर्मचारी भाजले असून उप कार्यकारी अभियंता किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक २१/०८/२०२१ रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास घडली.
औद्योगिक वसाहत किन्ही येथील ३३ के. व्ही. सब स्टेशन मध्ये तपासणी करीत असतांना अचानक पोटेनशीयल ट्रान्सफार्मर मधून विजेचा प्रवाह अधिक प्रमाणात वाढल्याने पोटेनशीयल ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला. व त्यामधून जास्त प्रमाणात ऑइल काम करणारे लाईनमन मच्छिंद्र लोखंडे यांच्या पाठीवर उडाल्याने पाठीमागील भाग ५०% भाजला गेला आहे.तर मक्तेदाराचा कर्मचारी अमोल महाजन यांचे उजव्या हाताला कोने पासून पंजा पर्यत भाजला गेला आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता ग्रामीण भुसावळ धनंजय प्रभाकर धांडे हे भाजलेल्या कर्मचाऱ्यास वाचविण्याचा प्रयत्न करीत असतांना या धावपळीत जमिनीवर पडल्याने किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या मानेवर व पायावर जखमा झाल्या आहे.
दरम्यान सदर घटना घडताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरीत
येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र शहरातील एकही रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जर अशीच परिस्थिती डॉक्टरांची असल्यास गंभीर रुग्ण आपला उपचार कसा घेणार ही एक संशोधनाची बाब आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून होत आहे.



