लक्ष्य निश्चित केल्याशिवाय यश मिळत नाही -पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे – भुसावळात रोटरी रॉयल्सतर्फे सन्मान कर्तबगारांचा कार्यक्रम

भुसावळ – लक्ष्य निश्चित केल्याशिवाय जीवनात यश मिळत नाही, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे केले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स आणि उदिता कन्स्ट्रक्शन भुसावल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी ‘सन्मान कर्तबगारांचा’ उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी विविध उदाहरणे देऊन जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र सांगितला.

भुसावळ शहरातील कला सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कर्तबगारी दाखवणार्‍या व्यक्तींचा तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या वर्गातील शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार येथील रोटरी हॉलमध्ये करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्थानी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी होते.

याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी रॉयलचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर व सचिव अ‍ॅड.विनोद तायडे, प्रकल्प प्रमुख गणेश फेगडे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक उदिता कन्स्ट्रक्शनचे संचालक रोटेरियन भूपेंद्र शर्मा, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा हे उपस्थित होते. प्रास्तविक प्रकल्प प्रमुख गणेश फेगडे यांनी केले. रोटेरियन राजीव शर्मा यांनी क्लबमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन सदस्यांना रोटरी ची पिन व प्रमाणपत्र देऊन त्यांना सदस्यत्व बहाल केले. यावेळी
भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार, आरोग्य अधिकारी प्रदीप पवार यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार तसेच महेश मुरलीधर चोपडे, मुकेश अग्रवाल, प्रवीण गडे व विनोद बबनराव उबाळे यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच स्मशान भूमी कर्मचारी अरुण रंधे यांना मानवता पुरस्कार देण्यात आला तर प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांना जीवरक्षक व डॉक्टर विक्रांत सोनार यांना जीवन दाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भुसावळ येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर तुषार पाटील आणि दिशा अतुल चौधरी यांना क्रीडा गौरव पुरस्कार तर क्षितीज राजेश मानवतकर यांना यशवंत पुरस्कार व रोटेरियन राजीव शर्मा यांना दातृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागर विसपुते यांना रक्तदाता पुरस्कार देण्यात आला. विशाखा सुनील शिंदे यांनी लुटारू मुलांच्या तावडीतून एका वृद्धाची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्यांना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. रमाकांत भालेराव यांना कला गौरव तर वीरेंद्र पाटील यांना नाट्य गौरव पुरस्कार, कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत अंजली रूनवे या दिव्यांग असूनही आपल्या कार्यालयात पूर्णवेळ प्रामाणिक सेवा केल्याबद्दल त्यांना धैर्य पुरस्कार तर वृक्षांचे संगोपन करून त्यांच्या नियमित वाढीकडे लक्ष देणारे नाना पाटील यांना वृक्षमित्र पुरस्कार, रणजितसिंग राजपूत यांना युवा वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 10वी व 12 वी तील यशस्वी विद्यार्थ्यांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचा स्वागत सोहळा क्लबचे माजी अध्यक्ष रोटेरियन उमेश नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रोटेरियन मोहन पाटील, सी.जी.पवार, योगेश उबाळे अनुप सिंग ठाकूर, प्रशांत सुतवणे, धीरज मुळे, अनंत वाटपाडे यांनी परीश्रम घेतले.